🔔 मासिक खर्चासाठी तातडीची आर्थिक गरज. मराठी अभ्यास केंद्राला प्रत्येक महिन्याला ₹४० ते ₹५० हजारांची आवश्यकता आहे. ₹१० पासून मासिक वर्गणीदार व्हा. आता मदत करा 🤝

नागरिकायन

पार्श्वभूमी

व्यवस्थेचे आणि लोकप्रतिनिधींच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी १ मे २०१९ रोजी नागरीकायन या केंद्राची स्थपना करण्यात आलेली आहे. शहरांमधील सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, परवडणारी घरे, मातृभाषेतील शिक्षणाचा प्रसार आणि लोकप्रतिनिधींच्या कामाचे मूल्यमापन या प्रमुख पाच विषयांवर ‘नागरिकायन’ काम करत आहे. यासाठी त्या त्या क्षेत्रातील अभ्यासकांची, जाणकारांची मदत घेण्यात येते, त्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

या केंद्रामार्फत माहिती अधिकाराचा वापर करून नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक बनविले जाते. त्यामुळे त्यातून मिळालेली माहिती ही अधिकृत आणि महापालिकेच्याच विभागातून मिळवलेली असते. बैठका आणि निधी या दोन निकषांवर नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक बनविले जाते. बैठकांमधून नगरसेवकांची उपस्थिती, त्यांनी मांडलेले प्रश्न, समस्या, ठराव, हरकतींचे मुद्दे यांची माहिती मिळते. यामधून नगरसेवकांचा आपल्या प्रभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, प्रभागातली त्यांना किती माहिती आहे हे कळते. तसेच निधीच्या माहितीमधून संबंधित नगरसेवकाला किती निधी मिळाला, किती खर्च झाला, तसेच कोणत्या कंत्राटदारावर, प्रभागातील कोणत्या कामांवर आणि प्रभागातील कोणकोणत्या ठिकाणी किती निधी खर्च झालेला आहे, याची माहिती मिळते. यामधून नगरसेवक आणि कंत्राटदारांचे संबंध ताडून पाहता येतात. प्रभागामध्ये एकाच प्रकारची कामे पुन्हा पुन्हा झालेली आहेत का हे कळते. तसेच प्रभागातील विशिष्ठ ठिकाणीच कामे झालेली आहेत का हेही पाहता येते. 

या उपक्रमामध्ये फक्त माहिती संकलित करणे आणि त्याचे विश्लेषण करणे एवढेच काम केले जात नाही. तर मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या कामांची प्रत्यक्ष प्रभागामध्ये ठिकठिकाणी जाऊन तपासणीही केली जाते. माहिती अधिकाराचे केवळ पाच अर्ज, बाराशे ते पंधराशे रुपयांचा खर्च आणि तीन महिन्यांचा कालावधी एवढ्या गुंतवणुकीवर नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक बनविले जाते.

ध्येये - उद्दिष्टे

महाराष्ट्राच्या शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागांतील नागरिकांच्या समस्या आणि पायाभूत सुविधा या प्रमुख घटकांचा प्रत्यक्षदर्शी व संशोधनात्मक पद्धतीने अभ्यास करणे.

वस्तुनिष्ठ माहिती व मूल्यभान देऊन नागरिकांचे सक्षमीकरण करणे.

व्यवस्थेचे निरंतर मूल्यांकन करीत अधिकाधिक पारदर्शी व उत्तरदायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहणे.

कार्ये

  • सप्टेंबर २०१६ सालापासून लोकप्रतिनिधींच्या कामांचे मूल्यमापन केले जात आहे. “माझा प्रभाग, माझा नगरसेवक’ हे या उपक्रमाचे शीर्षक आहे. याद्वारे नगरसेवकांच्या कामाचे प्रगतिपुस्तक बनविले जाते. २०१२ ते २०१७ या कार्यकाळातील १५ नगरसेवकांची, २०१७ ते २०१८ या एका वर्षातील १७ आणि २०१८ ते २०२० या कार्यकाळातील ११ नगरसेवकांची २२ प्रगतिपुस्तके, अशी एकूण ५६ प्रगतिपुस्तके प्रकाशित केली आहेत.
  • यासाठी आम्ही एक अ‍ॅप तयार केले. अ‍ॅपचे नाव माझा नगरसेवक my corporator असून ते ॲण्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींच्या प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. राज्यभरातील महापालिकांच्या नगरसेवकांच्या कामांची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी हा त्याचा हेतू आहे. सध्या हे अ‍ॅप कार्यरत नाही.
  • ‘नगरसेवक कसा असावा?’ या पुस्तिकेचे प्रकाशन आणि कार्यशाळा – निवडणुका जिंकणे, त्यासाठी प्रचार करणे हे जसे नगरसेवकाचे राजकीय कौशल्य आहे, तसेच महानगरपालिकेच्या विविध सभा, समित्यांमध्ये भूमिका मांडणे हे देखील महत्त्वाचे आहे. समित्यांच्या कामकाजाची नीट जाण असणारे नगरसेवक आपल्या मतदारसंघाचे हित अधिक चांगले पाहू शकतात. हे लक्षात घेऊन १७ ऑक्टोबर २०१६ रोजी ‘नगरसेवक कसा असावा?’ ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत याच शीर्षकाचे पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.  
  • मुंबईकरांचा जाहिरनामा – महाराष्ट्रातील आणि मुंबईतील एकूणच सर्वपक्षीय राजकीय परिस्थिती पाहता येत्या महापालिका निवडणुकांच्या प्रचारात राजकीय कलगीतुराच आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये मुंबईकरांचे रोजचे प्रश्न पुन्हा एकदा दुर्लिक्षित होतील अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या वेगवेगळ्या समस्या सोडविण्याचा आपापल्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या विविध संस्था, संघटना यांच्या सहकार्याने ‘मुंबईकरांचा जाहीरनामा’ तयार करावा अशी संकल्पना आम्ही ऑक्टोंबर २०२२ मध्ये मांडली. हा जाहीरनामा विविध राजकीय पक्ष, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबईकर यांच्यासमोर ठेवण्यात येणार असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये यातील मुद्यांवर चर्चा व्हावी असा आम्ही प्रयत्न करणार आहोत.

कृतिकार्यक्रम

  • २०२० ते २०२२ या कार्यकाळातील काही नगरसेवकांची प्रगतिपुस्तके लवकरच प्रकाशित करण्यात येतील.

आवाहन

२०२५-२६ मध्ये मुंबई, ठाणे, पुणे अशा मेट्रो शहरांच्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे हे वर्ष नागरिकांनी आपापल्या नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक करण्यासाठी वापरले तर आपल्याला अपेक्षित असलेला नगरसेवकांमधील बदल होण्यास सुरुवात होऊ शकेल. यासाठी आपल्याला आमच्याकडून मार्गदर्शन हवे असल्यास marathipalaksammelan2017@gmail.com या मेल आयडीवर संपर्क करावा.