न्यायालयीन मराठी
पार्श्वभूमी
१९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर लगेचच महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४’ पारित केला. राज्याचा शासनव्यवहार लोकभाषेतून—म्हणजेच मराठीतून—होण्यासाठी सदर कायदा करण्यात आला. विधिमंडळाचा कारभारही मराठीतून करण्यास सुरुवात झाली.
न्यायव्यवहार मराठीतून व्हावा यासाठी शासनाने प्रथम दि. ३० एप्रिल १९६६ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील जिल्हा व तालुका पातळीवरील न्यायव्यवहाराची भाषा मराठी ठरवण्यात आली. परंतु त्या अधिसूचनेतील त्रुटींमुळे न्यायव्यवहारात मराठी भाषेचा अपेक्षित वापर झाला नाही. परिणामी तब्बल ३२ वर्षांनंतर, दि. २१ जुलै १९९८ रोजी महाराष्ट्र शासनाने न्यायव्यवहाराच्या निरपवाद मराठीकरणासंदर्भात दुसरी अधिसूचना काढली.
तथापि, न्यायव्यवहाराच्या मराठीकरणाची अधिसूचना संमत झाली तरी तिच्या काटेकोर अंमलबजावणीकडे राज्यशासन व न्यायसंस्था कधीच पुरेसे गंभीर नव्हते; आजही नाहीत. अधिसूचनेच्या ठोस अंमलबजावणीसाठी विविध स्तरांवर आवश्यक पावले उचलणे गरजेचे होते. मात्र आज पंचवीस वर्षांनंतरही या विषयावरील अनास्था चीड आणणारी आहे.
मराठीचा शंभर टक्के वापर व्हावा यासाठी शासन, उच्च न्यायालय, प्रशासन, विद्यापीठे आदी अनेक स्तरांवर निर्धारपूर्वक धोरणात्मक निर्णयांची आवश्यकता आहे. आजच्या न्यायव्यवहारातील मराठीच्या दुरवस्थेला या सर्व घटकांची कृतिशून्यताच जबाबदार आहे, हे दुर्दैवी वास्तव आहे.
ध्येये - उद्दिष्टे
कायद्यांचे लोकाभिमुखीकरण : कायद्यांची आणि न्यायालयांची भाषा इंग्रजी असणे हे लोकशाही आणि सामाजिक न्याय या दोन्ही मूल्यांशी विसंगत असल्यामुळे कायदे सर्वांना समजावेत यासाठी त्यांचे मराठीकरण करणे.
नागरिकांना कायद्यांचे ज्ञान : लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांना कायद्यांचे मूलभूत ज्ञान मराठीतून उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणे.
वैधानिक जबाबदारीची जाणीव : कायदे लोकभाषेत उपलब्ध करून देणे ही सरकारची नैतिक व वैधानिक जबाबदारी आहे ही जाणीव लोकांमध्ये रुजवणे.
बहु-आघाडी पाठपुरावा : न्यायालयीन मराठीसाठी ठोस कृतिकार्यक्रमांची अंमलबजावणी व्हावी म्हणून विद्यापीठे, उच्च न्यायालय, शासनदरबारी इ. अनेक आघाड्यांवर पाठपुरावा करणे.
कार्ये
- २००६ साली मुंबई विद्यापीठाचा संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग व ‘मराठी भाषा संरक्षण आणि विकास संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘न्यायव्यवहारात मराठी : सद्य:स्थिती आणि आव्हाने’ या विषयावरील राज्यव्यापी परिषद आयोजित.
- पुस्तक प्रकाशन, सत्कार सोहळा – दिनांक ११ डिसेंबर २०१० रोजी अधिवक्ते संतोष आग्रे यांच्या ‘न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आणि न्यायव्यवहाराच्या मराठीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आणि न्यायव्यवहाराच्या मराठीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
- न्यायालयीन कामकाजात मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी दि. २२ व २३ जानेवारी २०११ रोजी नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेच्या वार्षिक वकील परिषदेत वरील पुस्तकाच्या १५०० प्रती परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ते जयंत जायभावे यांच्या पुढाकाराने सर्व मान्यवर वकील व न्यायाधीशांना वितरीत. दोन दिवसांच्या या परिषदेमध्ये न्यायव्यवस्थेसंदर्भात अनेक विषयांवर न्यायमूर्तींनी तसेच राज्यभरातील वकिलांनी मनमोकळेपणाने आपली मते मांडली.
- दि. १३ आणि १४ एप्रिल २०१३ रोजी ठाणे येथे झालेल्या महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेच्या वार्षिक वकील परिषदेत वरील पुस्तकाच्या २००० प्रती परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ते प्रमोद पाटील, अधिवक्ते श्री. जयंत जायभावे आणि श्री. गजानन चव्हाण यांच्या पुढाकाराने सर्व मान्यवर वकील व न्यायाधीशांना वितरीत. दिनांक १३ एप्रिल रोजी पहिल्या सत्रात या परिषदेचे उद्घाटन भारताचे कृषिमंत्री मा. शरदचंद्रजी पवार यांनी केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गणेश नाईक तसेच विधानपरिषदेचे उपसभापती मा. श्री. वसंत डावखरे आणि ठाणे जिल्ह्य़ातील सर्वपक्षीय खासदार व आमदार उपस्थित होते. या दिवशी दुसऱ्या सत्रात पारदर्शक न्यायदानासाठी मराठी भाषेचा वापर या विषयावर विचारमंथन करण्यात आले. न्यायदानात मराठीचा वापर होण्यासाठी वकील परिषदेत सर्व सहभागींना चेअरमन अॅड. प्रमोद पाटील यांच्यातर्फे अॅड. संतोष आग्रे यांनी लिहिलेल्या ‘न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी’ ह्या पुस्तकाच्या दोन हजार प्रती भेट देण्यात आल्या. न्यायदानात पारदर्शकता येण्यासाठी सर्वसामान्यांच्या म्हणजेच मराठी भाषेतून कामकाज होणे अत्यावश्यक असल्याचे सत्राचे प्रमुख वक्ते डॉ. दीपक पवार यांनी स्पष्ट केले.
- पुस्तक प्रकाशन सोहळा – महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेने दिलेल्या पाठ्यवृत्ती-अंतर्गत १४ एप्रिल २०२२ रोजी अड. संतोष आग्रे यांचे ‘न्यायभाषा मराठीचे वर्तमान’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
न्यायव्यवहाराच्या मराठीकरणासाठी कृतिकार्यक्रम
- कायदेविषयक : आपल्या विशिष्ट भूप्रदेशातील नागरिकांचे जीवन नियमित करण्यासाठी शासनसंस्था जे नियम करते त्याला आपण कायदा म्हणतो. हे नियम किंवा कायदे नागरिकांनी पाळण्यासाठी असतात, कायदा माहीत नसणे ही सबब होऊ शकत नाही, अशी संज्ञा प्रचलित आहे. पण सर्वसामान्य नागरिकाला कायदा माहीत करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे ज्यांनी कायदे पाळायचे आहेत ते त्यांना त्यांच्या भाषेत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही शासनाची आहे.
- प्रसार आणि प्रचार : केंद्र व राज्य शासनाचे कायदे सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगणे ही सरकारची नैतिकच नव्हे तर वैधानिक जबाबदारी आहे. सरकारने कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची योग्य प्रसिद्धी वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरदर्शन यांसारख्या माध्यामांतून केली पाहिजे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने कायदेविषयक एक मासिक मराठीत प्रसिद्ध केले पाहिजे; ज्यात नवे कायदे, नियम प्रकरणे, व महत्त्वाचे न्यायालयीन निवाडे यांचा समावेश असेल. हे प्रकाशन अगदी स्वस्त दरात सर्व न्यायालये, न्यायाधीश, वकील, सरकारी कार्यालये, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती आणि नागरिक यांना उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे.
- शासनाचे कायदेविषयक पुस्तक विक्री केंद्र : राज्य शासनाचे कायदे, शासननिर्णय, ठराव, परिपत्रके आदी साहित्य मराठी भाषेतून सर्वसामान्य जनतेला सहजपणे उपलब्ध होण्यासाठी जिल्हा न्यायालये तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या इमारतीत अधिकृत अथवा प्रतिनिधी नेमून पुस्तक साहित्य विक्री केंद्राची स्थापना करावी. त्याचप्रमाणे राज्यशासनाने शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर युनिकोडच्या माध्यमातून मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावे.
- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत शिबिरांचे आयोजन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत नागरिकांना घटनेबद्दल माहिती, नागरिकांचे अधिकार, कर्तव्ये, जबाबदाऱ्या तसेच रोजच्या व्यवहारातील सर्वसाधारण कायदे याबद्दल प्रसार होण्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन करावे.
- विधि अभ्यासक्रम : कायद्याचा अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठांशी संवाद साधून अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली पाठ्यपुस्तके मराठीतून निर्माण करण्यासाठी नामवंत तसेच अभ्यासू विधिज्ञांमार्फत तयार करून घ्यावी व शासनाने/ विद्यापीठाने ती प्रसिद्ध करावीत.
- न्यायालयीन मराठीकरण : न्यायालयीन कामकाजाच्या मराठीकरणाच्या प्रक्रियेला वेग येण्यासाठी न्यायाधीशांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये मराठीच्या अभ्यासक्रमाचा समावेश करणे; त्याचप्रमाणे सध्या न्यायाधीश पदांवर रूजू असलेल्यांसाठी याविषयी विशेष शिबिरे आयोजित करून प्रशिक्षण द्यावे.
आवाहन
ज्ञानभाषा, प्रगत व्यवहारभाषा म्हणून मराठीचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध क्षेत्रांतील ज्ञान मराठीत आणण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवरतर प्रयत्न करावाच.
तसेच यासाठी शासनावर संघटितपणे दबावतंत्राचा वापरही करावा.