🔔 मासिक खर्चासाठी तातडीची आर्थिक गरज. मराठी अभ्यास केंद्राला प्रत्येक महिन्याला ₹४० ते ₹५० हजारांची आवश्यकता आहे. ₹१० पासून मासिक वर्गणीदार व्हा. आता मदत करा 🤝

त्रिभाषा सूत्र

पार्श्वभूमी

प्रादेशिक भाषांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी केंद्र शासनाने त्रिभाषा सूत्राची तरतूद केली आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम पारित करून राज्यशासनाने कारभाराच्या मराठीकरणाची तरतूद केली आहे. इंग्रजीचे ज्ञान नसलेल्यांनाही बँकींग सुविधेचा लाभ घेता यावा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारी तसेच खाजगी व्यापारी बँकांना काही आदेश दिले आहेत. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमाअन्वये विद्यापीठांवर मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी शासनाने सोपवली आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या विकासासाठी काही स्वायत्त संस्थांची स्थापना महाराष्ट्र शासनाने केली आहे. असे असूनही मराठी समाज, भाषा व संस्कृती आज अस्तित्त्वाची लढाई लढताना दिसत आहेत. याचे कारण उपरोक्त तरतुदींचे पालन करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, ते आपली जबाबदारी योग्य तऱ्हेने पार पाडत नाहीत.

ध्येये - उद्दिष्टे

केंद्ग शासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रातील केंद्र शासनाच्या कार्यालयांमधून/प्राधिकरणांमधून जनतेच्या माहितीसाठी नामफलक व सूचनाफलक यांवर हिंदी व इंग्रजी भाषेसह मराठी भाषेचा वापर केला जात नसल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे  तक्रार करून अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणे.

जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यात केंद्र शासनाची जी कार्यालये / प्राधिकरणे आहेत त्यांमधून त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा आवश्यक तो वापर केला जातो किंवा कसे हे तात्काळ जाणून घेऊन शासनाकडे तसा अहवाल सादर करण्यासंबंधी तरतूद/आदेश आहेत. याबाबत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शासनाच्या भाषा संचालनालयावर असल्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करणे.

राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी परिसंवाद, चर्चा व व्याख्याने आयोजित करून शासनव्यवहार, कायदा, न्यायदान व तंत्रविद्या या सर्व क्षेत्रांत मराठीचा वापर करण्यास आग्रही राहणे. दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे या प्रसिद्धी माध्यमांनीही मराठीच्या संवर्धनासंबंधीचा विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाठपुरावा करणे व कार्यक्रम राबविणे.

प्रत्येक शासकीय कार्यालयाची मराठीकरणाच्या दृष्टीने तपशीलवार तपासणी करून तपासणीचा अहवाल त्या कार्यालयाकडून व संबंधित प्रशासकीय विभागाकडून मागविणे व त्यावर देखरेख ठेवणे.

कृतिकार्यक्रम

  • केंद्र शासनाने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ पारित करून जनतेला माहिती मिळण्याचा व त्याद्वारे शासनाच्या व शासनस्थापित संस्थांच्या कारभारातील त्रुटी उघड करण्याचा अधिकार दिला आहे. या अधिनियमाचा प्रभावी वापर करून शासन व नोकरीशाहीला मराठी भाषेसंबंधीच्या न्याय्य तरतुदींचा वापर करण्यास बाध्य करणे, हे या गटाचे उद्दिष्ट आहे. हे लक्षात घेऊन माहितीच्या अधिकाराखाली मराठी भाषेसंबंधीच्या नेमक्या तरतूदींची माहिती करून घेणे.
  • शासकीय व तत्सम कार्यालयांना भेटी देऊन / प्रपत्रे गोळा करून / वर्तमानपत्रांतील तक्रारींच्या आधारे या नियमांची पायमल्ली कोठे होते ते पाहणे.
  • संबंधित विभागात भाषाविषयक तरतुदींची अंमलबजावणी करण्यासंबंधी लेखी तक्रार नोंदविणे.
  • या तक्रारींचा माहितीचा अधिकार अधिनियमाखाली पाठपुरावा करणे.
  • योग्य माहिती न मिळाल्यास अपील करणे.
  • गरज पडल्यास न्यायालयात याचिका दाखल करणे.
  • बँकांच्या कामकाजातून (ए.टी.एम. केंद्रांसह) मराठीच्या वापराबद्दल पाठपुरावा करून विविध बँकांच्या ए.टी.एम. केंद्रांमध्ये मराठीचा वापर सुरू करून घेतला.
  • रेल्वेच्या कामकाजातील मराठीच्या वापरासाठी यशस्वी पाठपुरावा.

आवाहन

आपल्या परिसरातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर होतो की नाही याबाबत जागरूक राहावे. मराठी भाषेचा वापर होत नसल्यास संबंधित कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी.