🔔 मासिक खर्चासाठी तातडीची आर्थिक गरज. मराठी अभ्यास केंद्राला प्रत्येक महिन्याला ₹४० ते ₹५० हजारांची आवश्यकता आहे. ₹१० पासून मासिक वर्गणीदार व्हा. आता मदत करा 🤝

संगणकीय मराठी

पार्श्वभूमी

आधुनिक काळाशी सुसंगत जगण्यासाठी तंत्रज्ञानाशी जवळीक आवश्यक ठरते. मराठीच्या चौफेर विकासासाठी तिने तंत्रविद्येवर स्वार होण्याची गरज आहे. ह्याच ­जाणिवेतून ‘संगणकीय मराठी’ हा कृतिगट कार्य करीत आहे.

भाषेला लिपी लाभल्याने भाषा अ-क्षर बनली. लिपी हा भाषेच्या तांत्रिक प्रगतीतला महत्त्वाचा टप्पा होता. ह्यामुळे लिखित ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ झाली आणि त्यामुळे भाषाही समृद्ध होऊ लागली. मुद्रणाचा शोध हा दुसरा महत्त्वाचा टप्पा होता. लिपीमुळे भाषेला असलेली काळाची मर्यादा गळून पडली तशीच मुद्रणामुळे स्थळाची मर्यादा उणावली. लेखनाच्या प्रसाराला गती मिळाली. संगणकावर भाषा आरूढ होणे हा या विकासक्रमातला तिसरा महत्त्वाचा टप्पा. यामुळे भाषिक स्वरूपातली माहिती निर्माण करणे, साठवणे, तिची देवघेव करणे ह्या साऱ्याच प्रक्रिया विलक्षण सहज झाल्या. मुद्रणात उच्चाराऐवजी लेखनाला अधिक महत्त्व लाभले. पण या नव्या तंत्रज्ञानाने उच्चारालाही सामावून घेतले आहे.

ऐतिहासिक दृष्टीने पाहता भाषेसाठीचे हे सर्व संगणकीय तंत्रज्ञान प्रथम विकसित झाले ते मुख्यतः अमेरिकाखंडात आणि इंग्रजी ह्या भाषेकरता. संगणकावर ज्या मानवी भाषेत प्रथम व्यवहार होऊ लागला ती इंग्रजी होती. पुढे अनेक देशांनी आपापल्या लिप्या आणि भाषा संगणकसुकर केल्या. आपल्याकडे मात्र संगणक आणि इंग्रजी ह्यांच्यात अभेद मानला गेल्याने मराठीला संगणकसुकर करण्यात विलंब लागताना दिसतो आहे. आधुनिक युगातला फार मोठा भाषाव्यवहार संगणकावर होणार असल्याने मराठीची तिथे सोय न लागल्यास तिच्या विकासाचा वेग उणावेल हे उघड आहे.

मराठी भाषा संगणकसुकर व्हायला गती मिळावी, संगणकाधिष्ठित होऊन मराठी अधिकाधिक विकसित व्हावी ह्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच मराठीच्या संगणकीय व्यवहारात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी आणि मराठीला तंत्रसिद्ध करण्यासाठी हा कृतिगट काम करत आहे.

ध्येये - उद्दिष्टे

संगणकसुकर मराठी : इन्स्क्रिप्ट युनिकोड, कीबोर्ड लेआउट, फॉण्ट, OCR/ASR (आवाज ओळख) आदींचा सर्वसामान्य वापर वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे.

उपकरण-सुसंगती : मोबाइल/डेस्कटॉप/वेब इत्यादी उपकरणांवर इनस्क्रिप्ट मराठीचा अधिकाधिक वापर करण्यासंदर्भात जनजागृती करणे.

साधन-विकास : मुद्रितशोधन, शब्दकोश, अनुवाद, साहित्यशोध, भाषिक-विदा (डेटासेट्स) अशा मुक्त साधनांची निर्मिती आणि प्रसार. शिक्षक, विद्यार्थी, प्रशासक, निर्माते यांच्यासाठी कार्यशाळा/मार्गदर्शिका तयार करून प्रत्यक्ष वापर वाढवणे.

कार्ये

  • इन्स्क्रिप्ट युनिकोडविषयी लोकजागृती 
  • इन्स्क्रिप्ट युनिकोडची माहितीपुस्तिका : इनस्क्रिप्ट युनिकोड ह्या संकेतप्रणालीची माहिती देणारी प्रश्नोत्तराच्या स्वरूपाची एक माहितीपुस्तिका आशिष आल्मेडा आणि सुशान्त देवळेकर ह्यांनी लिहिली असून ती खालील दुव्यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. http://yunikodatunmarathi.blogspot.com/
  • कार्यशाळांचे आयोजन : आपल्या संगणकाच्या कार्यप्रणालीत असलेले (in built) इनस्क्रिप्ट युनिकोड कार्यन्वित करून संगणकावर मराठीतून काम कसे करायचे हे शिकवणाऱ्या अनेक कार्यशाळा सरकारी कार्यालये, वृत्तपत्रांची कार्यालये आणि विविध महाविद्यालये येथे विविध संस्थांच्या साहाय्याने आयोजित करण्यात आल्या.

आवाहन

  • मराठी टंकलेखनासाठी इनस्क्रिप्ट युनिकोड ही प्रणाली संगणकात आधीच असल्याने बाहेरून कोणतीही प्रणाली घ्यावी लागत नाही. तसेच ही वापरण्यासाठी महाजालाची (इंटरनेटची) आवश्यकता नाही. ही प्रणाली भारत सरकारने सर्व भारतीय भाषांसाठी प्रमाणीकृत केलेली असल्याने ती शास्त्रीय आहे. त्यामुळे इनस्क्रिप्ट युनिकोड प्रत्येकाने वापरावे आणि इतरांना वापरण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये, कार्यालयांमध्ये कार्यशाळा आयोजित कराव्यात.
  • महाराष्ट्र शासन मराठी टंकलेखनाच्या परीक्षेसाठी ISM किंवा तत्सम प्रणालींचा वापर करते. मात्र ही प्रणाली शास्त्रशुद्ध नाही. तसेच ही प्रणाली आपल्या संगणकामध्ये बाहेरून घ्यावी लागते आणि ती सशुल्क आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडे इनस्क्रिप्ट युनिकोड या प्रणालीचा वापर करून टंकलेखनाची परीक्षा घेण्यासाठी पाठपुरावा करावा.