माहिती अधिकार
पार्श्वभूमी
राज्य शासनाची परिपत्रके, आदेश, समित्यांचे अहवाल, बैठकींची इतिवृत्ते, निधी, नियुक्त्या इत्यादी गोष्टी माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येतात. या सर्व शासकीय माहितीच्या वापरातून राज्याच्या भाषाविषयक धोरणांची, त्याच्या अंमलबजावणीची सद्यःस्थिती कळते. त्यामुळे माहिती अधिकार कायदा हे फार महत्त्वाचे शस्त्र आहे.
ध्येये - उद्दिष्टे
माहिती अधिकार कायद्याचा जास्तीत वापर करून राज्यात मराठीच्या वापराची वस्तुस्थिती जाणून घेणे व त्या आधारे संबंधित यंत्रणेवर मराठीच्या वापरासाठी दबाव आणणे, जनजागृती करणे.
कार्ये
- भाषा संचालनालयाच्या दुरवस्थेबद्दल माहिती अधिकारात गोळा केलेल्या उत्तरांच्या माध्यमातून मराठी भाषा विभाग निर्मितीच्या चळवळीला पाठबळ.
- महाराष्ट्र शासनाच्या कारभारातील मराठी भाषेच्या वापरासंबंधी माहिती गोळा करून त्याआधारे प्रसारमाध्यमांतून मोहीम.
- न्यायव्यवहाराच्या मराठीकरणाबद्दल विविध जिल्हा व तालुका न्यायालयांतून गोळा केलेल्या माहिती आधारे ‘न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी’ या पुस्तकाची निर्मिती.
- बॅंकांच्या कामकाजातून (ए.टी.एम. केंद्रांसह) मराठीच्या वापराबद्दल पाठपुरावा करून विविध बॅंकांच्या ए.टी.एम. केंद्रांमध्ये मराठीचा वापर सुरू करून घेतला.
- रेल्वेच्या कामकाजातील मराठीच्या वापरासाठी यशस्वी पाठपुरावा.
- राज्य शासनाचे मंत्रालयीन विभाग, विधीमंडळ यांमधील मराठी भाषेच्या वापरासंबंधी माहिती गोळा करून त्याआधारे ‘मराठी भाषेची अ – श्वेतपत्रिका’ प्रसिद्ध केली.
आवाहन
वैयक्तीक रागलोभापेक्षा मराठी भाषेच्या वापरासाठी, वाढीसाठी माहिती अधिकार कायद्याचा हरेक मराठी माणसाने जाणीवपूर्वक वापर करावा. त्यासाठी काही मदत लागल्यास केंद्राशी संपर्क करावा.