🔔 मासिक खर्चासाठी तातडीची आर्थिक गरज. मराठी अभ्यास केंद्राला प्रत्येक महिन्याला ₹४० ते ₹५० हजारांची आवश्यकता आहे. ₹१० पासून मासिक वर्गणीदार व्हा. आता मदत करा 🤝

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न

पार्श्वभूमी

संयुक्त महाराष्ट्राच्या ‘लढ्याची घोषणा मुंबई – बेळगाव – कारवार – बिदर – भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी होती. यांपैकी मुंबई आपण १०७ जणांच्या हौतात्म्यानंतर मिळवली. पण बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी, बिदर, भालकी अजूनही कर्नाटकव्याप्त प्रदेश आहे. साराबंदीच्या चळवळीपासून सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यापर्यंत अनेक आघाड्यांवर लढाई चालू आहे. या लढ्यात जवळपास चार पिढ्या कामी आल्या, तरीही अद्याप यश आलेले नाही. एका अर्थाने हा राज्य पुनर्रचनेचाच अपुरा राहिलेला कार्यक्रम आहे.

कार्ये

  • २०१० सालापासून मराठी अभ्यास केंद्र सीमाप्रश्नाच्या लढ्यात सहभागी झाले. धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांनी क्षेत्रभेटींसाठी केलेल्या आर्थिक सहकार्यातून मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते सीमाभागांत फिरले. त्यांनी तिथल्या जवळपास ८० लोकांच्या मुलाखती घेतल्या.
  • या मुलाखतींचे शब्दांकन आणि संकलनाचे काम सध्या शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या ‘प्रबोधन’ या संस्थेच्या आर्थिक सहकार्याने चालू आहे. 
  • सीमाभागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना महाराष्ट्रातील प्रयोगशील शिक्षणाची माहिती व्हावी यासाठी दोन वेळा दौरे करण्यात आले. पहिला दौरा २९ जून २०१५ ते ४ जुलै २०१५ या काळात करण्यात आला. तर दुसरा दौरा २ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०१७ या काळात करण्यात आला. 
  • सीमाभागात फिरत असातना खानापुरातील नारायण कापोलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चालवलेल्या ‘मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान’ या संस्थेशी संपर्क आला. ही संस्था खानापूर तालुक्यातल्या मराठी शाळांच्या जतन-संवर्धनासाठी काम करते. या संस्थेसाठी २०१६ मध्ये मराठी अभ्यास केंद्राने प्रबोधन गोरेगावच्या आर्थिक सहकार्याने फिरते वाचनालय उपलब्ध करून दिले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या फिरत्या वाचनालयाचे लोकार्पण केले. जवळपास आठ-नऊ वर्षे फिरते वाचनालय चालवल्यानंतर आता त्याचे स्थिर वाचनालयात रूपांतर करण्यात आले आहे.
  •  फेब्रुवारी २०२० ते एप्रिल २०२२ या काळामध्ये डॉ. दीपक पवार हे महाराष्ट्र शासनाचे ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्ना’चे विशेष कार्य अधिकारी होते. या काळात श्रीकांत देशपांडे यांच्यासारख्या संवेदनशील आणि प्रभावी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनामुळे ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद – संघर्ष आणि संकल्प’ हे पुस्तक पवारांनी संपादित केले. (पुस्तकाची पीडीएफ मिळवण्यासाठी दुवा – https://seemavad-book.web.app).
  • पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा व्हिडिओ दुव्यावर पाहता येईल – Watch on YouTube

आवाहन

सीमाप्रश्नाच्या बाबतीत अनेक कारणांनी चळवळीत आणि विचार करण्याच्या पद्धतीत गोठलेपणा आला आहे. ही कोंडी फुटायला हवी असेल तर नव्या पिढीला सोबत घेऊन व्यापक मराठीकारण व महाराष्ट्रधर्माचा भाग म्हणूनच लढले पाहिजे, तरच यशाची शक्यता आहे. यासाठी महाराष्ट्रातील आणि सीमाभागातील तरुणाईला या लढाईत तत्परतेने उतरण्याचे आवाहन करत आहोत. ही लढाई समाजमाध्यमांवर लढण्याची नसून रस्त्यावर उतरून लढण्याची आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.