🔔 मासिक खर्चासाठी तातडीची आर्थिक गरज. मराठी अभ्यास केंद्राला प्रत्येक महिन्याला ₹४० ते ₹५० हजारांची आवश्यकता आहे. ₹१० पासून मासिक वर्गणीदार व्हा. आता मदत करा 🤝

मराठी संशोधन प्रकल्प

पार्श्वभूमी

आज मराठीपुढे जागतिकीकरणाचे आणि विद्याशाखांच्या तंत्रज्ञानाधिष्ठीत इंग्रजीकरणाचे जबरदस्त आव्हान उभे ठाकले आहे. मात्र साहित्यकेंद्री संशोधन व व्यावहारिक मराठीकडे दुर्लक्ष यामुळे मराठी विकासाच्या संशोधनाची विदारक अवस्था आहे. एकविसाव्या शतकातील मराठीच्या विस्ताराचे मार्ग शोधून काढण्यासाठी मराठीचे अनेक उपयोजित संशोधन-प्रकल्प कार्यान्वित करण्याची गरज आहे. त्यासाठी मुळात मराठीच्या संशोधनाची समयोचित आणि समाजोपयोगी मांडणी काय असावी यासाठी चाकोरीबाहेरील विचार येणाऱ्या काळात सातत्याने होत राहिला पाहिजे. 

संशोधनातून विद्याशाखेचा विकास हे शिक्षण, उद्योग व समाजकारणातील मान्यताप्राप्त तत्त्व आहे. सातत्यपूर्ण संशोधन हे अनेक विद्याशाखांच्या प्रगतीचे, आधुनिकीकरणाचे आणि शाश्वतीचे प्रमुख साधन आहे. ज्या ज्ञानाला संशोधनाचे वावडे असते, तिच्यात साचलेपणा येतो आणि त्या शाखेची व्यावहारिक वाढ संपुष्टात येते.

ध्येये - उद्दिष्टे

कृतिगट-आधारित उपयोजित संशोधन उभारून मराठीच्या विकासाला दिशा व वेग देणे.

 

विविध संशोधन प्रकल्प राबवणे – सर्वेक्षण, सांख्यिकी माहिती व संदर्भ-साहित्य संकलन / संपादन इत्यादी.

विखुरलेल्या संस्था/भाषाप्रेमी/अभ्यासकांचा डिजिटल माहितीकोश तयार करून तो सातत्याने अद्ययावत ठेवणे.

संशोधन-निष्कर्षांवर आधारित धोरण-शिफारसी मांडून भाषिक प्रश्नांची उकल करणे.

पाठ्यवृत्ती योजना (अर्धवेळ/पूर्णवेळ) सुरू करून कार्यकर्ते घडवणे व प्रकल्पाधारित कामे करवून घेणे.

कार्ये : पाठ्यवृत्ती योजना

  • संगणकीय मराठी : १ मे २०१० ते ३० एप्रिल २०११ या कालावधीसाठी अतुल तुळशीबागवाले यांच्याकडून संगणकीय मराठी या विषयावरील संशोधनासाठी राममोहन खानापूरकर यांना पाठ्यवृत्ती.
  • मराठी शाळा व माहिती अधिकार : १ सप्टेंबर २०१० ते ३१ ऑगस्ट २०११ या कालावधीसाठी ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांच्याकडून मराठी शाळा आणि माहिती अधिकार या विषयावरील संशोधनासाठी तुषार पवार यांना पाठ्यवृत्ती
  • विनाअनुदानित मराठी शाळांचे सर्वेक्षण : विनाअनुदानित मराठी शाळांच्या मान्यतेच्या लढ्याचा भाग म्हणून या शाळांच्या सर्वेक्षणासाठी  अतुल तुळशीबागवाले यांच्याकडून आरती पवार आरती पवार यांना १ ऑगस्ट २०११ ते ३१ जुलै २०१२ या कालावधीसाठी पाठ्यवृत्ती.
  • भारतीय भाषांची स्थितीगती : ‘भारतातील प्रादेशिक भाषांची स्थितिगती आणि भाषिक चळवळींचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावरील संशोधनासाठी भाऊसाहेब बांदोडकर ट्रस्टच्या वतीने तुषार पवार यांना १ सप्टेंबर २०११ ते ३१ ऑगस्ट २०१३ या कालावधीसाठी पाठ्यवृत्ती. या दौऱ्यात आलेले विविध भाषानुभव ‘भाषा परिक्रमा’ या पुस्तकात मांडण्यात आले आहेत.
  • महाविद्यालयांतील भाषा व वाड्;मय मंडळांचे सक्षमीकरण : भाषा आणि वाङ्‍मय मंडळांच्या सक्षमीकरणाच्या प्रकल्पासाठी अतुल तुळशीबागवाले यांच्याकडून १ मे २०१३ ते ३० एप्रिल २०१४ या काळासाठी अर्थसाहाय्य. या प्रकल्पाचे समन्वयन साधना गोरे यांनी केले.

आवाहन

  • मराठीच्या संशोधन-क्षेत्रात व्यावहारिक मराठीसाठी फारसे काम न झाल्यामुळे अनेक प्रकल्प राबविण्याची नितांत आवश्यकता आहे. यातील बरेचसे प्रकल्प हे महाराष्ट्रव्यापी असल्यामुळे मनुष्यबळ आणि द्रव्यबळ या दोन्ही गोष्टींची गरज आहे. त्यासाठी आम्ही मराठीप्रेमी उद्योजक व विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना निधीसाठी आवाहन करत आहोत. आपल्याकडे मराठीच्या संदर्भात संशोधनाचे काही प्रस्ताव विचाराधीन असतील तर आपण आमच्या संशोधनगटाचे साहाय्य घेऊ शकता.
  • आर्थिक साहाय्यासोबतच महाविद्यालयातील उत्साही विद्यार्थ्यांचा या गटाला फार मोठा हातभार लागू शकतो. सर्वेक्षण प्रकल्प, मुलाखती, क्षेत्रीय कार्य, माहिती संकलन अशा विविध संशोधनकार्यासाठी तरुणवर्गाला संशोधन प्रकल्पांशी जोडून घेण्याचे मित्रत्वाचे आवाहन मराठी अभ्यास केंद्र करत आहे. महाविद्यालयांचे मराठी विभाग, शासकीय संस्था अशा संशोधन प्रकल्पांना अर्थसाहाय्य व मनुष्यबळ पुरवू शकतात. आपल्याकडे या कृतिगटाच्या विस्तारासाठी आणि प्रसारासाठी काही सूचना असतील तर आपण आम्हाला जरूर कळवा.