पार्श्वभूमी
आज मराठीपुढे जागतिकीकरणाचे आणि विद्याशाखांच्या तंत्रज्ञानाधिष्ठीत इंग्रजीकरणाचे जबरदस्त आव्हान उभे ठाकले आहे. मात्र साहित्यकेंद्री संशोधन व व्यावहारिक मराठीकडे दुर्लक्ष यामुळे मराठी विकासाच्या संशोधनाची विदारक अवस्था आहे. एकविसाव्या शतकातील मराठीच्या विस्ताराचे मार्ग शोधून काढण्यासाठी मराठीचे अनेक उपयोजित संशोधन-प्रकल्प कार्यान्वित करण्याची गरज आहे. त्यासाठी मुळात मराठीच्या संशोधनाची समयोचित आणि समाजपयोगी मांडणी काय असावी यासाठी चाकोरीबाहेरील विचार येणाऱ्या काळात सातत्याने होत राहिला पाहिजे. संशोधनातून विद्याशाखेचा विकास हे शिक्षण, उद्योग व समाजकारणातील मान्यताप्राप्त तत्त्व आहे. सातत्यपूर्ण संशोधन हे अनेक विद्याशाखांच्या प्रगतीचे, आधुनिकीकरणाचे आणि शाश्वतीचे प्रमुख साधन आहे. ज्या ज्ञानाला संशोधनाचे वावडे असते, तिच्यात साचलेपणा येतो आणि त्या शाखेची व्यावहारिक वाढ संपुष्टात येते.
ध्येये-उद्दिष्टे-
मराठीच्या विकासाचे विविध कृती-गट हा मराठी अभ्यास केंद्राच्या चळवळीचा गाभा आहे. या कृतिगटांतून मराठीच्या विकासाचे जे विविध उपक्रम राबवले जातात, त्यांची माहिती या संकेतस्थळावर इतरत्र आली आहे. कृती-गटांना संशोधनाच्या माध्यमातून अधिकाधिक परिपूर्ण करण्यासाठी हा गट प्रयत्नशील असेल. कृतिगटांशी निगडीत विषयांच्या सखोल अध्ययनासाठी संशोधन प्रकल्प राबवणे. ज्यात सांख्यिकी माहिती संकलन, सर्वेक्षण-प्रकल्प, संदर्भ-साहित्य अशा विविध संशोधनपूरक उप-प्रकल्पांचा समावेश असेल. विविध संशोधन प्रकल्पांतून मराठी समाजापुढील भाषिक प्रश्नांची उकल करणे. मराठीच्या संदर्भात अनेक संस्था, भाषाप्रेमी, अभ्यासक, विचारवंत, शासकीय विभाग बहुमोल कार्य करीत आहेत. भविष्यकाळात मराठीच्या दीर्घकालीन नियोजनासाठी या इतस्तत: विखुरलेल्या संस्थांना आणि मराठीप्रेमींना एकत्रित करुन त्यांचा माहितीकोश तयार करणे आणि तो अद्ययावत ठेवणे. मराठीच्या विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी पूर्णवेळ कार्यकर्ते मिळावेत, आणि त्यांना त्यांच्या कामाचा मोबदलाही देता यावा याकरता अर्धवेळ आणि पूर्णवेळ अशा प्रकारचे पाठ्यवृत्ती प्रकल्प सुरू करणे. या पाठ्यवृत्तीच्या माध्यमातून विविध विषयांवरील संशोधनाची आणि सर्वेक्षणाची कामे करून घेणे.
पाठ्य़वृत्ती योजना-
१ मे २०१० ते ३० एप्रिल २०११ या कालावधीसाठी अतुल तुळशीबागवाले यांच्याकडून संगणकीय मराठी या विषयावरील संशोधनासाठी राममोहन खानापूरकर यांना पाठ्यवृत्ती.
१ सप्टेंबर २०१० ते ३१ ऑगस्ट २०११ या कालावधीसाठी ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांच्याकडून मराठी शाळा आणि माहिती अधिकार या विषयावरील संशोधनासाठी तुषार पवार यांना पाठ्यवृत्ती
विनाअनुदानित मराठी शाळांच्या मान्यतेच्या लढ्याचा भाग म्हणून या शाळांच्या सर्वेक्षणासाठी अतुल तुळशीबागवाले यांच्याकडून आरती पवार हिला १ ऑगस्ट २०११ ते ३१ जुलै २०१२ या कालावधीसाठी पाठ्यवृत्ती.
भारतातील प्रादेशिक भाषांची स्थितिगती आणि भाषिक चळवळींचा तुलनात्मक अभ्यास या विषयावरील संशोधनासाठी भाऊसाहेब बांदोडकर ट्रस्टच्या वतीने तुषार पवार यास १ सप्टेंबर २०११ ते ३१ ऑगस्ट २०१३ या कालावधीसाठी पाठ्यवृत्ती.
भाषा आणि वाङ्मय मंडळांच्या सक्षमीकरणाच्या प्रकल्पासाठी अतुल तुळशीबागवाले यांच्याकडून १ मे २०१३ ते ३० एप्रिल २०१४ या काळासाठी अर्थसहाय्य.
आवाहन
मराठीच्या संशोधन-क्षेत्रांत व्यावहारिक मराठीसाठी फारसे काम न झाल्यामुळे अनेक प्रकल्प राबविण्याची नितांत आवश्यकता आहे. यातील बरेचसे प्रकल्प हे महाराष्ट्रव्यापी असल्यामुळे मनुष्यबळ आणि द्रव्यबळ या दोन्ही गोष्टींची गरज आहे. त्यासाठी मराठी अभ्यास केंद्र मराठीप्रेमी उद्योजक व विविध क्षेत्रांतील नामवंत लोकांना निधीसाठी आवाहन करत आहे. आपल्याकडे मराठीच्या संदर्भात काही संशोधनाचे प्रस्ताव विचाराधीन असतील तर आपण आमच्या संशोधनगटाचे सहाय्य घेऊ शकता.
आर्थिक सहाय्यासोबतच महाविद्यालयातील उत्साही विद्यार्थ्यांचा या गटाला फार मोठा हातभार लागू शकतो. सर्वेक्षण प्रकल्प, मुलाखती, क्षेत्रीय कार्य, माहिती संकलन अशा विविध संशोधनकार्यासाठी तरुणवर्गाला संशोधन प्रकल्पांशी जोडून घेण्याचे मित्रत्वाचे आवाहन मराठी अभ्यास केंद्र करत आहे. महाविद्यालयांचे मराठी विभाग, शासकीय संस्था अशा संशोधन प्रकल्पांना अर्थसहाय्य करु शकतात. आपल्याकडे ह्या कृतीगटाच्या विस्तारासाठी आणि प्रसारासाठी काही सूचना असतील तर आपण आम्हाला जरुर कळवा.