पार्श्वभूमी

मराठीचा विविध क्षेत्रांतील वापर वाढावा, काळाच्या ओघाने येणा-या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदलांमध्ये मराठी भाषा आणि पर्यायाने मराठी संस्कृती टिकून रहावी, वृध्दिंगत व्हावी, मराठी भाषासमृद्ध व्हावी यासाठी अनेक वर्षे प्रयत्न चालू आहेत. आजवरच्या मराठी भाषिक चळवळीनं प्रामुख्याने मराठी वाचक आणि मराठी लेखकांना केंद्र्स्थानी ठेवल्याने सामान्य मराठी माणसाच्या आणि मराठी समाजाच्या सर्वांगीण अस्तित्वाच्या प्रश्नांना हात घालण्यात या चळवळी अपयशी ठरल्या असं वाटतं. नोक-या मिळवायच्या असतील, औद्योगिक प्रगती साधायची असेल तर इंग्रजी भाषेचं ज्ञान गरजेचं आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषेतलं शिक्षण, वाचन ही केवळ एक सांस्कृतिक गरज किंवा जबाबदारी या अर्थानेच पाहिलं जातं. तिच्या अस्तित्वाचा मूलभूत प्रश्नांशी काही थेट संबंध नसतो. या पार्श्वभूमीवर संस्कृती वगैरे अर्थातच भरल्यापोटी सुचणा-या चैनी आहेत एकूण समज निर्माण झाला. अशा परिस्थितीत केवळ संस्कृती टिकावी म्हणून मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी या दृष्टीने प्रयत्नांना मर्यादित यश येणं साहजिकच होतं. या सगळ्या प्रयन्नांचे मूळ स्वरूप भाषिक चळवळींचे होते. भाषेच्या समृद्धीसाठी मराठी लेखक, प्राध्यापक, प्रकाशक, कलावंत झटत असतांना अभियांत्रिकी, स्थापत्यशास्त्र, वैद्यकीय, वित्त व्यवसाय, व्यवस्थापन या व अशा इतर अनेक क्षेत्रात मराठी माणसं झपाट्यानं प्रगती करत होती व  त्यांच्या या प्रगतीत मराठी भाषेचा कुठेही संबंध नव्हता. ही दुर्दैवी असली तरी वस्तुस्थिती होती आणि अजूनही आहे. समाजाच्या आणि विशेषत: मराठी समाजाच्या एकूण समाज-जीवनाच्या एका मोठ्या भागाचा मराठी भाषेशी, तिच्या अस्तित्वाशी काहीही संबंध नव्हता. याला जशी अनेक ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक कारणं आहेत, तसंच एक महत्वाचं कारण म्हणजे आर्थिक आहे.  गेल्या शतकात ऐहिकतावादाने एकूणच इतर सर्व विचार प्रवाहांना मात दऊन समाजमनाचा ताबा मिळवला. जागतिकीकरणानंतर त्याची झळ आपल्याला भारतात जास्त प्रकर्षाने जाणवू लागली. ऐहिक सुखाच्या वस्तूचे संचयन आणि त्यासाठी आवश्यक असलेली सतत चढत्या वेगानं आर्थिक वाढ हे सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक गतीचं आणि त्या गतीची दिशा ठरवणारं एकमेव कारण झालेलं आहे. ऐहिक सुखांच्या आणि आर्थिक वाढीच्या आड येणारी, इतकच काय पण त्याला पूरक नसलेली कुठलीही सांस्कृतिक, सामाजिक जाणीव किंवा वैज्ञानिक संकल्पना योजनाबद्ध पध्दतीने वा अनुल्लेखाने मारली जाते हे आपण गेली अनेक वर्ष पाहतोय. भाषा ही त्याला अपवाद नाही. भाषेच्या तसेच इतर सांस्कृतिक संरचनांच्या अस्तित्वाची किंवा त्यांच्या –हासामागची आर्थिक कारणं जाणून घेणं म्हणूनच महत्वाचं ठरतं  म्हणूनच या बाबतीतील उपायांचा विचार करतांनादेखील समाजाच्या आर्थिक गरजांचा, आकांक्षांचा विचार होणं गरजेचं आहे. मराठी अर्थव्यवस्था  या गटाच्या विविध कार्यक्रमांची ही भूमिका असेल.

ध्येये-उदिष्टे

 (१)       भाषिक विकास आणि समाजाची आर्थिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधांचे स्वरुप काय आहे याचा अभ्यास करून चर्चासत्रे, परिषदा यांचे आयोजन करणे.

(२)       महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील ‘ ’मराठी अर्थव्यवस्थेच्या’ कक्षा अधोरेखित करणे व या ‘`मराठी’ अर्थव्यवस्थेचे स्वरुप समजावून घेणे.

(३)       अर्थव्यवस्थेतील विविध घटकांना, भाषिक चळवळींशी कशा प्रकारे जोडता येईल याचा अभ्यास करणे.

(४)       मराठी समाजासाठी मराठी भाषेतून आर्थिक प्रगतीच्या अधिकाधिक संधी कशा प्रकारे निर्माण करता येतील याचा अभ्यास करणे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे. 

कार्ये–

वरील मुद्दे लक्षात घेता या गटाच्या कार्यक्रमांचा महत्वाचा भाग हा अर्थकारणातील विविध गटांना एका व्यासपीठावर जमवून त्यांच्याशी भाषिक अर्थकारण या विषयावर संवाद घडवून आणणे हा असेल. त्याच्या बरोबरीनं सध्याच्या परिस्थितीत मराठी रोजगाराच्या संधी कशा वाढवता येतील याबाबत प्रयत्न करणे हे देखील गटाच्या कार्यक्रमांचं उद्दिष्ट असेल. कार्यक्रमाचं स्वरूप –

(१)  मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, जागतीक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, सॅटर्डे क्लब अशा मराठी भाषिक उद्योजकांचे समूह, कामगार संघटना, जातनिहाय आणि व्यवसायनिहाय मंडळं यांच्या प्रतिनिधींसोबत भाषेच्या अर्थकारणाबाबत चर्चासत्र आयोजित करणे.

(२)  मराठी उद्याजकांशी संवाद साधून भाषेसंदर्भात त्यांच्या अडचणी समजून घेणे व त्यावर उपाय शोधण्यात त्यांना मदत करणे – उदा. – कर्मचा-यांचे मराठी बाबत प्रशिक्षण, संबंधित तंत्रज्ञान वा प्रशिक्षित कर्मचा-यांशी संपर्क घडवून आणणे.

(३)  भाषेबाबतच्या विविध आर्थिक गटांच्या मागण्यासाठी चाललेल्या आंदोलनात सहभागी होणे.

(४)  विविध व्यवसायातील मराठी माणसांची यादी बनवणे व ती संबंधितांना उपलब्ध करुन देणे.

विविध क्षेत्रातील मराठी माणसांशी, उद्योजकांच्या समूहांशी होणा-या चर्चेतून कार्यक्रमांच्या कक्षा अधिक व्यापक होत जातील.