उच्च शिक्षण आणि मराठी

पार्श्वभूमी

ज्ञानाधिष्ठित समाज आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यामध्ये उच्च शिक्षणाचा वाटा फार मोठा आहे. अर्थात त्यासाठी व्यापक शैक्षणिक सुधारणांची गरज आहे. प्रचलित अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीत कालोचित बदल केल्याशिवाय शिक्षणाचा अपेक्षित लाभ विद्यार्थ्यांना व पर्यायाने समाजाला होणार नाही.विद्यापीठांनी याकामी पुढाकार घेऊन आवश्यक त्या शैक्षणिक सुधारणा कराव्यात अशी राज्य शासनाची भूमिका आहे.

          महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर मराठी हा विषय गेली अनेक वर्षे शिकवला जातो. परंतु ह्या विषयाचा पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम प्राधान्याने साहित्यकेंद्री राहिलेला असून त्यात कालानुरूप आवश्यक ते  बदल फारसे झालेले  नाहीत. परिणामी आजकाल ह्या विषयाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. विशेष म्हणजे आज हा विषय अभ्यासणारे विद्यार्थी प्रामुख्याने बहुजन समाजातील असतात. मराठी भाषेच्या व साहित्याच्या आवडीने ते मराठी या विषयाकडे वळत असले तरी चांगल्या गुणांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त करूनही त्यांच्यावर  बेकार राहण्याची पाळी येत आहे. मराठीच्या पारंपरिक अभ्यासक्रमांची उद्दिष्टे व स्वरूप आणि गेल्या दशकभरात बदललेले व्यवसाय-रोजगारांचे जग यांच्यात विसंगती निर्माण झाल्यामुळे मराठीच्या प्रचलित पाठ्यक्रमांचा पुनर्विचार करून त्यांत कालोचित सुधारणा करण्याची वेळ आली आहे.

ध्येये – उद्दिष्टे

  • मराठीच्या विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त केल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात ह्या दृष्टीने विविध भाषाव्यवहारांशी संबंधित कौशल्यांवर भर देणारे पाठ्यक्रम सुरू करणे
  • जे व्यवहार इंग्रजी भाषेत होतात ते मराठी भाषेत व्हायचे असतील तर त्याचे शिक्षण व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे
  • स्थितिशीलता व कालोचित बदलांचा अभाव यांमुळे मराठीच्या उच्च शिक्षणाचे जे डबके झाले आहे ते प्रवाही व्हावे,विस्तारावे आणि त्याचा लाभ मराठीच्या भावी विद्यार्थ्यांना,मराठी भाषेला व एकूणच ज्ञानव्यवहाराला व्हावा ह्या हेतूने मराठीच्या उच्च शिक्षणाची नवी दिशा सुचवण्याचा प्रयत्न करणे.

कार्य

  • डॉ. प्रकाश परब यांनी लिहिलेल्या ‘मराठीच्या उच्च शिक्षणाची दशा आणि दिशा’ या पुस्तकाचे प्रकाशन.
  • या पुस्तकातील प्रस्तावाच्या आधारे पदवी आणि पदव्युतर पातळीवरच्या मराठीच्या शिक्षणाचे विस्तारीकरण व्हावे यासाठी महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठांकडे प्रस्ताव सादर. काही विद्यापीठांमध्ये अंमलबजावणीला सुरुवात.
  • उच्च आणि तंत्र शिक्षण विभागामार्फत याबाबत धोरणात्मक बदल व्हावेत यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांकडे पाठपुरावा.
  • मुंबई विद्यापीठाच्या बीएमएम (बॅचलर ऑफ मास मीडिया) अभ्यासक्रमाचे मराठीकरण यशस्वी. त्यात प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधींचा लक्षणीय सहभाग.
  • मुंबई विद्यापीठांतर्गत महाराष्ट्र अध्ययन केंद्राची स्थापना व्हावी यासाठी यशस्वी पाठपुरावा.

आवाहन

ज्ञानभाषा, प्रगत व्यवहारभाषा म्हणून मराठीचे सक्षमीकरण करण्यासाठी विविध क्षेत्रातील ज्ञान मराठीत आणण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवरतर प्रयत्न करावाच. तसेच यासाठी शासनावर संघटितपणे दबावतंत्राचा वापरही करावा.