संस्थेविषयी
‘मराठी अभ्यास केंद्र’ हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मानाचे स्थान मिळेल असे स्वप्न आपण पाहिले. मराठी माणूस या राज्यातच नव्हे, तर जगभर स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवेल अशी आशा बाळगली. मराठी संस्कृतीचा भविष्यकाळ हा तिच्या इतिहासाइतकाच देदीप्यमान असेल, असे गर्जत राहिलो.
प्रत्यक्षात स्थिती काय आहे? लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मराठी मागे पडत आहे. शिक्षणापासून न्यायालयापर्यंत कुठल्याच क्षेत्रांत मराठीला मानाचे स्थान आपण मिळवून देऊ शकलो नाही. देश-विदेशात मराठी माणसांनी उत्कर्ष साधला, पण हा उत्कर्ष मराठी समाजाच्या तळाच्या घटकांपर्यंत अजूनही पोहोचलेला नाही.
समृद्धीचे दरवाजे ज्यांच्यासाठी खुले झालेत, अशांपैकी बहुतेकांना मराठी भाषा-संस्कृतीशी फारसे देणेघेणे राहिलेले नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात ‘मातृभाषा’ वगैरे जुनाट गोष्टींच्या फंदात न पडता व्यक्तिगत उत्कर्षाकडे लक्ष द्यावे, अशी भूमिका राज्यकर्ते, नोकरशहा, अभिजनवर्गापैकी अनेक जण आग्रहाने मांडत आहेत. बहुजन समाज मात्र प्रगतीच्या संधींचा शोध घ्यायचा की आपली भाषा व समाज यांच्याशी निष्ठा राखायची, अशा कात्रीत सापडला आहे. आपली भाषा, समाज यांच्याशी बांधिलकी जपणे म्हणजे प्रगतीच्या मार्गापासून लांब राहणे, असे चित्र उभे राहत आहे.
परिणामी, मराठीच्या प्रश्नांवर कोणी आणि कसे लढायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने सुरू झालेली चळवळ हे या कोंडीवरचे उत्तर आहे.
अभ्यासातून सिद्ध झालेली विधायक चळवळ हे केंद्राचे स्वरूप आहे. प्रतिक्रियात्मक आणि प्रतीकात्मक पद्धतींनी आंदोलने चालवून प्रश्न सुटल्यासारखे वाटतील, पण सनदशीर मार्गाने, चिकाटीने केलेल्या पाठपुराव्याची सोबत त्याला नसेल, तर हे यश तात्कालिक ठरेल. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठीसाठी निर्माण झालेल्या विविध राजकीय चळवळींतून या धोक्याची प्रचिती आपल्याला आलीच आहे.
म्हणूनच, आता मराठीची चळवळ नव्या पायावर उभी राहायला हवी.
संस्थेची ध्येये आणि उद्दिष्टे
८
प्रमुख श्रेणी
३२
उद्दिष्टे
२०+
वर्षांचा अनुभव
१००+
सक्रिय सदस्य
१. भाषा संवर्धन / विकास
- ▸ मराठी भाषेचे, संस्कृतीचे जतन व संवर्धन करून भारताची भाषिक-सांस्कृतिक विविधता जपणे.
- ▸ लोकभाषा, राजभाषा मराठीची ज्ञानभाषा म्हणून जडणघडण करणे.
- ▸ मराठी भाषेच्या व्यावहारिक क्षमतांचा विकास साधणे व ती खऱ्या अर्थाने जगण्याची भाषा करणे.
- ▸ मराठी ही महाराष्ट्रीय समाजाच्या चरितार्थाची व अर्थार्जनाची भाषा व्हावी यासाठी नियोजनबद्ध रीतीने कार्य करणे.
- ▸ जागतिकीकरण व चुकीची भाषिक धोरणे यांमुळे होणारी मराठीची गळती थांबवणे.
- ▸ मराठी भाषेची उपयुक्तता वाढवून तिला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
२. शैक्षणिक / प्रशिक्षण उपक्रम
- ▸ शिक्षण क्षेत्रात मराठी व इंग्रजी या भाषांचा वापर आणि स्थान समकक्ष राहावे यासाठी प्रयत्नशील राहणे.
- ▸ मराठी व अमराठी दोन्ही गटांना व्यावहारिक इंग्रजी / मराठीचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या प्रवाहात आणणे.
- ▸ मराठी भाषेला माहिती-तंत्रज्ञानाची जोड देणे, मराठीतून संगणकव्यवहाराचे प्रशिक्षण देणे.
- ▸ मराठी शाळा बंद पडू नयेत तसेच त्यांचा दर्जा सुधारावा यासाठी कार्य करणे.
- ▸ शैक्षणिक मदतीसाठी शिष्यवृत्ती योजना राबवणे.
- ▸ शैक्षणिक संस्था, वाचनालये, ग्रंथालये व संगणक प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करून आधुनिक शिक्षणाला चालना देणे.
३. संशोधन आणि प्रशासकीय धोरण
- ▸भाषा व्यवहाराच्या विकासाचे संशोधन व सर्वेक्षण प्रकल्प राबवणे.
- ▸न्यायालयीन क्षेत्रात मराठीला अधिकृत दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.
- ▸भाषा हे राज्याचे प्राथमिक संसाधन आहे — शासनाला जबाबदार धरणे.
- ▸स्थलांतरामुळे उद्भवणाऱ्या भाषिक समस्यांचा अभ्यास करणे व उपाययोजना करणे.
- ▸मराठी भाषेवरील संशोधन, अभ्यास शिबिरे, सत्रे, परिषदांचे आयोजन व प्रकाशन करणे.
४. संस्थात्मक बळकटी आणि संपर्कजाळे
- ▸प्रशासन आणि लोकसंवादातून मराठी वापराच्या यंत्रणा प्रस्थापित करणे.
- ▸मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी कार्यरत व्यक्ती व संस्थांचा डेटाबेस तयार करणे.
- ▸राज्यात व राज्याबाहेर संपर्क केंद्रे व कृतिगटांची स्थापना करणे.
- ▸समान उद्दिष्टे असलेल्या संस्थांशी सहकार्य व संलग्नता निर्माण करणे.
- ▸इतरत्र शाखा स्थापन करणे.
५. सामाजिक एकात्मता आणि जनजागृती
- ▸इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे होणारे शोषण थांबवणे.
- ▸जातिधर्मात विखुरलेल्या समाजाला मराठी भाषक समाज म्हणून एकत्र आणणे.
- ▸मराठी वापराबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे; तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करणे.
६. प्रसार आणि प्रकाशन
- ▸संस्थेचे मुद्रित / ई-मुखपत्र चालवणे, संस्थेचे संकेतस्थळ तयार करून कार्याचा डिजिटल विस्तार करणे.
- ▸व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करणे किंवा सहभागी होणे.
- ▸पत्रके, पुस्तिका, नियतकालिके प्रकाशित करणे.
७. आर्थिक आणि व्यावसायिक विकास
- ▸मराठी भाषेचा व्यावसायिक वापर वाढवणे व माहितीची देवाणघेवाण करणे.
- ▸सांस्कृतिक कार्यक्रम, स्मरणिका व देणग्यांद्वारे आर्थिक स्थैर्य राखणे.
८. प्रोत्साहन आणि गौरव
- ▸सामाजिक किंवा सार्वजनिक कामास साहाय्यभूत योजना राबवणे.
- ▸स्पर्धात्मक प्रोत्साहन, पारितोषिके व मानचिन्हे प्रदान करणे.
आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन करीत आहोत.
आपणही आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अभिप्राय पाठवून या चळवळीत सहभागी व्हावे तसेच मदतीचा हातभार लावावा.