आज मराठी अभ्यास केंद्रात काम करत असलेले बहुतांश कार्यकर्ते २००२ सालापासून मराठी भाषेच्या चळवळीत काम करत आहेत. महाराष्ट्र शासनाने २००२ साली ११ वी १२ वी साठी मराठीला माहितीतंत्रज्ञानाचा पर्याय दिला, त्याविरुद्ध सुरू झालेल्या आंदोलनात मराठीच्या शिक्षकांसोबत इतर अनेक क्षेत्रातील लोकांनी भाग घेतला. एका अर्थाने मराठी अभ्यास केंद्राच्या कामाची मुहूर्तमेढ या आंदोलनामुळे रोवली गेली आहे.
न्यायालयीन मराठीच्या प्रश्नावर शांताराम दातार यांच्यासोबत परिसंवाद, शासनाशी पत्रव्यवहार आणि आंदोलने या माध्यमातून केंद्राने दोनेक वर्षे काम केले. २००६ साली मुंबई विद्यापीठाचा संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग व मराठी भाषा संरक्षण आणि विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘न्यायव्यवहारात मराठी : सद्यस्थिती आणि आव्हाने’ या विषयावरील राज्यव्यापी परिषद झाली. ती यशस्वी करण्यात आणि न्यायालयीन मराठीचा प्रश्न सर्वदूर पोचवण्यात आज मराठी अभ्यास केंद्रात असलेल्या कार्यकर्त्यांचा महत्वाचा सहभाग होता.
मराठीच्या एकेका प्रश्नावर काम करून भागणार नाही, त्यासाठी अनेक आघाड्यांवर एकाचवेळी लढले पाहिजे असा विचार करून १ डिसेंबर २००७ रोजी समविचारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली. यावेळी मराठीच्या चळवळीसाठी आधारभूत ठरणारे एक संशोधन केंद्र असावे अशा हेतूने मराठी अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली. त्याचबरोबरीने मराठीसाठी काम करणाऱ्या विविध चळवळींना एका व्यासपीठावर आणून एक व्यापक राजकीय चळवळ उभारावी असाही प्रयत्न होता. नंतरच्या काळात मराठी अभ्यास केंद्र हे संशोधन आणि चळवळ दोन्हींचेही व्यासपीठ ठरले.
मुंबईत १ डिसेंबर २००७ रोजी या अभ्यास केंद्राची स्थापना झाली. डॉ. प्रकाश परब आणि प्रा. दीपक पवार हे या अभ्यास केंद्राचे समन्वयक होते. त्यानंतर अभ्यास केंद्राची कार्यकारिणी निश्चित झाली. अभ्यास केंद्राचा संस्था नोंदणी क्रमांक –महा/६९४/०९/ठाणे तसेच विश्वस्त संस्था नोंदणी क्रमांक – एफ/१८५०१/ठाणे असा आहे. अभ्यास केंद्राचे मुख्य कार्यालय ठाणे येथे आहे.
बुधवार दि. २७ फेब्रूवारी २००८ रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना हुतात्मा स्मारकासमोर अभिवादन करुन मराठी भाषेच्या विकासाकरीता गार्हाणे घालण्यात आले. शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी २००९ रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी अभ्यास केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. हे कार्यालय प्रा. रमेश पानसे यांच्या सौजन्याने मिळाले आहे. महाराष्ट्र फौंडेशनमार्फत अतुल तुळशीबागवाले यांनी केलेल्या मदतीतून कार्यालयाचे संगणकीकरण झाले. १ मार्च २००९ पासून कार्यालय नियमितपणे सुरू झाले व मराठी अभ्यास केंद्राच्या कार्याला गती आली.