विविध विषयांचा सखोल अभ्यास करून मांडलेल्या उपाययोजना आणि त्या उपाययोजनांवर आधारित कृतिलक्ष्यी चळवळ ही ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये आहेत.

अभ्यास केंद्राची रचना ही कृतिगटांवर आधारित आहे. प्रत्येक कृतिगट हा त्या त्या विषयावरच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावरील शक्य असलेल्या उपायांची मांडणी समाजातील संबंधित घटकांपुढे करत  असतो. समाजात विविध स्तरांवर चर्चा घडवून एक व्यापक कृतिआराखडा तयार करण्यावर केंद्राचा भर असतो. त्या कृतिआराखड्याप्रमाणे विशिष्ट कालमर्यादेत एखादा प्रश्न निर्णायकपणे  सोडवण्यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा करणे हे एक महत्त्वाचे कार्य असते. यासाठी आम्ही पुढील मार्गांचा अवलंब करतो.

  • शासकीय व निमशासकीय यंत्रणांशी मराठीच्या वापराबाबत पत्रव्यवहार करणे.
  • भाषेच्या प्रश्नांवर जनजागरणासाठी समविचारी संस्था, संघटनांशी जोडून घेऊन उपक्रम राबविणे.
  • विविध व्यवहारक्षेत्रातील मराठीच्या वापराबद्दल माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती गोळा करून त्याआधारे चळवळींची आखणी करणे.
  • राजकीय पक्ष, त्यांच्याशी संलग्न असलेल्या विद्यार्थी संघटना, कामगार संघटना यांच्याशी संपर्क साधून मराठीच्या विविध प्रश्नांबद्दल त्यांना माहिती पुरविणे व त्याआधार निर्माण होणाऱ्या आंदोलनांसाठी पाठपुरावा करणे.
  • विधिमंडळात तसेच संसदेत लोकप्रतिनिधींच्या मार्फत किंवा राजकीय पक्षांच्या मार्फत भाषेच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा करणे. त्यासाठी संबंधितांना आवश्यक ते संदर्भ उपलब्ध करून देणे.
  • प्रसारमाध्यमांना आंदोलनांमध्ये सक्रियरित्या सहभागी करून घेणे. त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करणे.
  • मराठीच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पाठ्य़वृत्तीद्वारे अहवाल तयार करून तो संबंधितांना अमंलबजावणीसाठी देणे.
  • मराठीच्या प्रश्नांबाबत कृतीआराखडे तयार करून शासनदरबारी पाठपुरावा करणे.
  • विविध व्यवहारक्षेत्रातील प्रश्नांचे गांभीर्य समाजापुढे मांडण्यासाठी पुस्तिका आणि पुस्तके प्रकाशित करून त्या विषयांचा प्रसार व प्रचार करणे.
  • संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभरातल्या मराठी माणसांना भाषेच्या प्रश्नांशी जोडून घेणे.
  • सनदशीर आंदोलनांच्या माध्यमातून मराठी भाषा, समाज व संस्कृतीचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी जनमत संघटित करणे.