कृतिगटाची भूमिका

आधुनिक काळाशी सुसंगत जगण्यासाठी तंत्रज्ञानाशी जवळीक आवश्यक ठरते. मराठीच्या चौफेर विकासासाठी तिने तंत्रविद्येवर स्वार होण्याची गरज आहे. ह्याच ­जाणिवेतून ‘संगणकीय मराठी’ हा कृतिगट कार्य करीत आहे.

भाषेला लिपी लाभल्याने भाषा अ-क्षर बनली. लिपी हा भाषेच्या तांत्रिक प्रगतीतला महत्त्वाचा टप्पा होता. ह्यामुळे लिखित ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ झाली आणि त्यामुळे भाषाही समृद्ध होऊ लागली. मुद्रणाचा शोध हा दुसरा महत्त्वाचा टप्पा होता. लिपीमुळे भाषेला असलेली काळाची मर्यादा गळून पडली तशीच मुद्रणामुळे स्थळाची मर्यादा उणावली. लेखनाच्या प्रसाराला गती मिळाली. संगणकावर भाषा आरूढ होणं हा ह्या विकासक्रमातला तिसरा महत्त्वाचा टप्पा. ह्यामुळे भाषिक स्वरूपातली माहिती निर्माण करणं, साठवणं, तिची देवघेव करणं ह्या साऱ्याच प्रक्रिया विलक्षण सहज झाल्या. मुद्रणात उच्चाराऐवजी लेखनाला अधिक महत्त्व लाभलं. पण ह्या नव्या तंत्रज्ञानाने उच्चारालाही सामावून घेतलं आहे.

ऐतिहासिक दृष्टीने पाहता भाषेसाठीचं हे सर्व संगणकीय तंत्रज्ञान प्रथम विकसित झालं ते मुख्यतः अमेरिकाखंडात आणि इंग्रजी ह्या भाषेकरता. संगणकावर ज्या मानवी भाषेत प्रथम व्यवहार होऊ लागला ती इंग्रजी होती.  पुढे अनेक देशांनी आपापल्या लिप्या आणि भाषा संगणकसुकर केल्या. आपल्याकडे मात्र संगणक आणि इंग्रजी ह्यांच्यात अभेद मानला गेल्याने मराठीला संगणकसुकर करण्यात विलंब लागताना दिसतो आहे. आधुनिक युगातला फार मोठा भाषाव्यवहार संगणकावर होणार असल्याने मराठीची तिथे सोय न लागल्यास तिच्या विकासाचा वेग उणावेल हे उघड आहे.

मराठी भाषा संगणकसुकर व्हायला गती मिळावी, संगणकाधिष्ठित होऊन मराठी अधिकाधिक विकसित व्हावी ह्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच मराठीच्या संगणकीय व्यवहारात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी आणि मराठीला तंत्रसिद्ध करण्यासाठी हा कृतिगट काम करत आहे.