मराठी शाळा
पार्श्वभूमी
आपल्याकडच्या अभिजन वर्गाला जागतिकीकरणाच्या काळात मराठीतून शिकणे हे संकुचितपणाचे लक्षण वाटू वागले तर बहुजनवर्गाला मराठीतून शिकणे म्हणजे विकासाच्या संधीची दारे बंद होणे वाटू लागले.
इंग्रजी माध्यमातून शिक्षण म्हणजे जागतिक दर्जाचे शिक्षण आणि मराठी शाळेतून शिक्षण म्हणजे आपल्या मुलांना मागे ठेवणे अशी समीकरणे समाजमानसात रुतून बसली.
मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून घडण्यासाठी आणि टिकण्यासाठी मराठी शाळा टिकणे अपरिहार्य आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असलेले पण मातृभाषेपासून तुटलेले लोक आपापल्या क्षेत्रातले नवे ज्ञान इंग्रजीतच फिरत ठेवतात. याचे दूरगामी परिणाम भयावह आहेत. म्हणूनच मराठी भाषेची वाढ आणि संवर्धन करण्यासाठी मराठी शाळा सक्षम कराव्या लागतील, हे ओळखून मराठी शाळा या गटाची स्थापना करण्यात आलेली आहे.
ध्येये - उद्दिष्टे
मराठी शाळांच्या सरसकट सेमी इंग्रजीकरणाला विरोध आणि त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा. मराठी शाळांच्या बाजूने व्यापक समाजाची मानसिकता घडवणे.
मराठी शाळा गुणवत्तापूर्ण करणे. मराठी माध्यमातील पालकांशी संवाद साधणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे.
युवा वर्गाला मराठी शाळांच्या प्रश्नांचे गांभीर्य समजावून सांगणे व त्यांना मराठी शाळांच्या चळवळीत सामील करून घेणे.
कृतिकार्यक्रम
- शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांना मराठीतून सर्व विषय शिकण्याचा पर्याय ठेवण्यास भाग पाडणे.
- महाराष्ट्रातील शाळांमध्ये चाललेल्या प्रयोगांचे तसेच विज्ञान परिषदेसारख्या संस्थांमधील उपक्रमांचे सार्वत्रिकीकरण करणे.
- गटचर्चा, क्षेत्रभेटी, भित्तिपत्रके, प्रदर्शने, मेळावे इत्यादी आयोजित करणे.
- ग्रंथाली, थिंक महाराष्ट्र, वसंत व्याख्यानमाला इत्यादींशी जोडून व्याख्याने, परिसंवाद इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करणे. नववर्षाच्या स्वागतयात्रांमध्ये मराठी शाळांचा सहभाग वाढवणे.
- राष्ट्रीय सेवा योजना, मराठी वाङ्मय मंडळ यांच्यासोबत कार्यक्रमांचे आयोजन करणे.
संस्थेची विविध कार्ये
आवाहन
- मराठी शाळांसाठी आरक्षित भूखंडावर अतिक्रमण होत असल्यास ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत.
- लायन्स क्लब, इनर्व्हिल क्लब, कोमसाप, ग्रंथसंग्रहालये इत्यादी संस्थांना मराठी शाळांशी जोडून शाळा सक्षमीकरणाच्या उपक्रमांमध्ये सहभागी करावे.
- मराठी शाळांतून शिकून विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेल्या मराठी विद्यार्थ्यांची माहिती मराठी अभ्यास केंद्रास पाठवावी. किंवा ही माहिती समाजमाध्यमांवर टाकण्याचे प्रयत्न करावेत.
- देवस्थाने, ज्ञातिसंस्था, पर्यटन, कौटुंबिक कार्यक्रम ह्यांवर आपण सढळपणे पैसा खर्च करतो. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी मराठी शाळा वाचवणे ही सुद्धा आपली सांस्कृतिक जबाबदारी आहे हे समजून आर्थिक सहकार्य करावे.
- मातृभाषा मराठीतून शिक्षण हा आपल्या मुलांचा हक्क आहे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाकरता मायबोलीच अपरिहार्य आहे हे ओळखून पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळांमध्ये शिकवावे.
- मराठी शाळांनी आपली गुणवत्ता, प्रयोगशीलता अधिक ठळकपणे समाजापुढे यावी ह्यासाठी प्रसिद्धीची आवश्यक ती तंत्रे आत्मसात करावीत. त्यासाठी आवश्यक तिथे प्रसारमाध्यमांचे सहकार्य घ्यावे.
- मराठी शाळांमधील प्रयोगशाळा, वाचनालये, संगणक प्रयोगशाळा सक्षम व्हाव्यात म्हणून प्रयत्न करावेत.