आमचे उपक्रम
चालू उपक्रम
युनिकोड कार्यशाळा
मराठी टंकलेखन प्रशिक्षण
युनिकोड म्हणजे काय?
संगणकाला कोणतीही मानवी भाषा कळत नाही. संगणकाला केवळ ० व १ ची Binary (द्विपद) भाषा कळते. संगणकीय क्षेत्रात भाषांचे प्रमाणीकरण करण्यासाठी १९९१ साली ना नफा ना तोटा या तत्त्वावर युनिकोड कन्सॉर्शिअम या संस्थेची स्थापना करण्यात आली. अॅपल, गूगल यांसारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या संस्थेच्या सदस्य आहेत. तसेच भारत देश आणि तामिळनाडू राज्य शासन तसेच बर्कलेसारखे विद्यापीठ हेही कन्सॉर्शिअमचे सदस्य आहेत हे लक्षणीय आहे. युनिकोड म्हणजे कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम किंवा प्रोग्रॅमद्वारे लोकांना स्वभाषेतून संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करता येणे. यामध्ये प्रत्येक भाषेचे स्वतंत्र एकसमान मानक वापरलेले असते. युनिकोड हे वेगळे सॉफ्टवेअर नाही, तर ते संगणकाच्या कार्यप्रणालीतच (Operating System) असते. फक्त आपल्याला हवी ती भाषा सुरू करायची असते.
कार्यशाळेचा उद्देश
आपण जितक्या सहजपणे पेनाने कागदावर मराठी लिहितो, तितक्याच सहजपणे आपल्याला संगणकावर मराठी लिहिता यावे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. सध्या इंग्रजी-रोमन लिपी वापरून मराठी लिहिली जात असल्यामुळे आपली पुढील पिढी लिहिताना मराठी वर्णमालाच विसरून जाण्याची शक्यता आहे. आपली लिपी याप्रकारे विस्मृतीत जाऊ नये म्हणून सुद्धा इनस्क्रिप्ट युनिकोडच्याच माध्यमातून मराठी टंकलेखन करणे आवश्यक आहे.
आवाहन
१. आपल्या संगणकावर इनस्क्रिप्ट युनिकोड कसे सुरू करायचे आणि नंतर टंकलेखन कसे करायचे यासाठी सोबत सादरीकरण जोडलेले आहे. आपण त्याच्या साहाय्याने स्वतःहून शिकू शकता.
२. आपल्या कार्यालयात किंवा शाळा-महाविद्यालयामध्ये युनिकोडची कार्यशाळा घ्यायची असल्यास आम्हाला marathipalaksammelan2017@gmail.com या मेलवर संपर्क करा.
मराठीप्रेमी पालक महासंमेलन
पार्श्वभूमी
मराठी शाळांसाठी काम करत असताना शाळांचे शिक्षक आणि संस्थाचालक यांचे आम्हाला नेहमीच सहकार्य मिळत होते. मात्र कधी वैयक्तिक हितसंबंधांमुळे तर कधी सरकारी अटींमुळे त्यांच्या सहकार्याला मर्यादा पडत होत्या. शिवाय, मराठी शाळांच्या या सगळ्या घडामोडीत पालक नावाचा घटक कुठेही दिसत नव्हता. त्यामुळे मराठी शाळांचे प्रश्न एकूणच समाजालाही आपलेसे वाटत नाहीत असे दिसत होते. या सर्वांचाच एकत्रित परिणाम म्हणून मराठी शाळांचे प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे होत होते. या सगळ्याचा विचार करता जोवर पालक या घटकाचे खंबीर सहकार्य मराठी शाळांना मिळणार नाही, तोवर आज दिसणारे मराठी शाळांचे चित्र बदलणार नाही, या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. आणि त्यातूनच ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ ही संकल्पना आकाराला आली.
उद्देश
‘मुलासाठी कोणतं माध्यम निवडावं?’ ‘मराठी माध्यमात घालून मुलाला पुढे अडचण तर येणार नाही ना?’ अशी विचारणा करणारे पालक आम्हांला सातत्याने भेटत असतात. आजवर अशा पालकांशी संवाद साधून एक गोष्ट आमच्या लक्षात आली, ती म्हणजे त्यांनी माध्यमाचा निर्णय आधीच घेतलेला असतो. मराठी माध्यमाची निवड केलेल्यांकडे मुलाचा आनंद आणि सोपे शिक्षण एवढे एकच सबळ कारण असते, तर इंग्रजी माध्यमाची निवड केलेल्यांकडे मराठी माध्यम कसे शक्य नाही, याच्या किमान दहा ते बारा तरी सबबी असतात. त्यामध्ये ‘बायको/नवरा ऐकत नाही’ ते ‘घराजवळ चांगली मराठी शाळा नाही’ इथपर्यंत सबबींचा समावेश असतो. २०१७ मध्ये आम्ही या संमेलनाला सुरुवात केली तेव्हा या सबबींचे/कारणांचे निराकरण करणे कसे शक्य आहे, या विचारातून चर्चासत्रांची आखणी केली. त्यातूनच ‘सजग आणि सुजाण पालकत्वासाठी’ असे संमेलनाचे घोषवाक्य निश्चित करण्यात आले.
संमेलन कोणासाठी?
यातील ‘मराठीप्रेमी’ हा शब्द महत्त्वाचा. ज्यांची मुले मराठी शाळेत आहेत किंवा या आधी होती ते तर मराठीप्रेमी आहेतच, पण बाहेरच्या रेट्यापायी, खोट्या प्रतिष्ठेपायी ज्यांनी आपली मुले इंग्रजी शाळेत घातली आहेत, मात्र तिथल्या शिक्षणाच्या सुमार गुणवत्तेमुळे, वाढत्या शुल्कामुळे आणि मुलांच्या होणाऱ्या मानसिक कोंडीमुळे ज्यांना मराठी शाळेकडे वळावेसे वाटते आहे, असे पालकही आम्ही मराठीप्रेमीच समजतो. तसेच ज्यांचे मूल इंग्रजी शाळेत आहे, आणि तरीही त्यांना मराठी शाळेसाठी काम करायची इच्छा आहे, अशा पालकांनाही आम्ही मराठीप्रेमीच मानतो. थोडक्यात, मराठी शाळांबाबत काही तरी विधायक काम करणारा हरेकजण आम्ही मराठीप्रेमीच मानतो आणि अशा सर्वांसाठी हे संमेलन आहेच. तसेच ज्यांचे मूल आता चार-पाच वर्षांचे आहे आणि त्याच्यासाठी शाळा निवडाची आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात या संमेलनात जरूर यायला हवे, असा आमचा आग्रह असतो. ‘आपण मुलाला मराठी माध्यमात घालून चूक तर केली नाही ना?’, अशी थोडी फार साशंकता असणाऱ्या मराठी शाळांमधील आजच्या पालकांना त्यांचा निर्णय अचूक आहे, हा आत्मविश्वास देणे हाही या संमेलनाचा एक उद्देश आहेच.
आजवर घेण्यात आलेली मराठीप्रेमी पालक महासंमेलने :
१. डी.एस. हासस्कूल, शीव, मुंबई – २०१७
२. नूतन विद्यामंदिरचे महाराष्ट्र विद्यालय, गोरेगाव, मुंबई – २०१८
३. आर. एम. भट हायस्कूल, परळ, मुंबई – २०१९
४. गुरुकुल विद्यालय, बदलापूर, २०२०
५. महाराष्ट्र सांस्कृतिक प्रतिष्ठान, खानापूर, बेळगाव २०२०
६. ऑनलाइन – २०२०
७. अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे नंदादीप विद्यालय – २०२३
संमेलनातील विविध सत्रे :
२०१७ पासून आजवर संमेलनातील सत्रांच्या विषयांमध्ये बरेच बदल झालेले आहेत. त्यातील काही सत्रे सर्व संमेलनामध्ये कायम राहिली आहेत. काहींच्या स्वरूपात बदल करण्यात आला तर काही सत्रे पालकांची गरज म्हणून नव्याने समाविष्ट करण्यात आली –
- मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील पालकांची आणि शिक्षकांची भूमिका
- गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांसाठी
- मराठी माध्यमातील यशवंतांच्या यशोगाथा
- शालेय शिक्षणातील भाषा, कला आणि क्रीडा समृद्धी
- शिक्षणाचे माध्यम आणि पालक (आई/बाबा) म्हणून माझी भूमिका
- मराठी शाळांसमोरील आव्हाने आणि नावीन्यपूर्ण उपाय
- मराठी शाळांसाठी आम्ही काय करणार?
याशिवाय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची जागर फेरी आयोजित केली जाते. महाराष्ट्रातील विविध प्रयोगशील मराठी शाळांमधील साहित्याचे आणि ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात येते. संमेलनात आयोजक शाळेतील शिक्षक-पालकांसोबतच त्या परिसरातील इतर शाळांतील शिक्षक- पालकांनाही आवर्जून सहभागी करून घेतले जाते.
आवाहन
१. आजवर आयोजित केलेल्या सर्व संमेलनांच्या सर्व सत्रांच्या चित्रफिती मराठी अभ्यास केंद्र’ https://www.youtube.com/@MarathiAbhyasKendraAdhikrut) या यूट्युब चॅनेलवर उपलब्ध आहेत. जिज्ञासूंनी त्या अवश्य पाहाव्यात.
२. आपल्या शाळेत असे संमेलन आयोजित करायचे असल्यास आम्हाला marathipalaksammelan2017@gmail.com या मेलवर संपर्क करावा.
मराठी भाषा पुरस्कार
पार्श्वभूमी
विविध व्यवहारक्षेत्रांत मराठीचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी मराठी अभ्यास केंद्र विविध कृतिगटांच्या मार्फत काम करते. गेल्या काही वर्षांपासून मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र मराठीसाठी काम करणाऱ्या विविध व्यक्ती आणि संस्था यांच्या सहकार्याने विशेष कार्यरत आहे. कारण मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृती टिकेल अशी केंद्राची धारणा आहे. मात्र हे कार्य एक संस्था एकाकीपणे तडीस नेऊ शकणार नाही. म्हणून मराठीच्या संवर्धनाचे कार्य जिथे कुठे चालू आहे त्याची नोंद घेऊन ते समाजापुढे आणावे असा केंद्राचा प्रयत्न आहे.
मराठी भाषेच्या पडझडीच्या काळात मराठीसाठी अभ्यासाच्या व चळवळीच्या अंगाने आयुष्य झिजवणाऱ्या व्यक्तींबद्दल केंद्राला नेहमीच आदर आणि अभिमान वाटतो. अधिवक्ता शांताराम दातार आणि आयएएस अधिकारी रवींद्र सुर्वे ही अशीच दोन नावे. लोकभाषा व राजभाषा असलेल्या मराठीचा न्यायालयांमध्ये प्रभावी वापर व्हावा म्हणून शांताराम दातार यांनी अथक परिश्रम घेतले. मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेले कार्य सर्वपरिचित आहे. समाज व शासन स्तरावर मराठी भाषेच्या वापराबाबत ते नेहमीच आग्रही राहिले. रवींद्र सुर्वे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (IAS) आणि कवी होते. मराठी भाषेवर, साहित्यावर त्यांचे नितांत प्रेम होते.
मराठी अभ्यास केंद्राचे दुसरे एक सुहृद जयवंत चुनेकर हेही मराठीच्या ध्यासाने शैक्षणिक क्षेत्रात आयुष्यभर काम करीत राहिले. कोशनिर्मिती, अमराठी भाषकांसाठी मराठीचे अध्यापन या क्षेत्रांतील चुनेकर यांचे योगदान मोलाचे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेऊन प्रदीर्घ काळ निःस्पृह पत्रकारिता करणारे दिनू रणदिवे मराठी पत्रकारितेतील दीपस्तंभ होते. स्व. अशोक नाना चुरी यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीतून दुर्गम व आदिवासी भागांत उल्लेखनीय शैक्षणिक काम करणाऱ्या शिक्षकांसाठी आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार दिला जातो. आज ह्या चारही व्यक्ती हयात नसल्या तरी त्यांनी मराठी भाषेसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांची स्मृती जपण्यासाठी तसेच मराठीसाठी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून मराठी अभ्यास केंद्र २०१९ सालापासून त्यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देत आहे. शिक्षण, भाषा आणि प्रसारमाध्यमे या क्षेत्रांत मराठीसाठी लक्षवेधी कार्य करणाऱ्या व्यक्तींची / संस्थांची या पुरस्कारांसाठी निवड करून संबंधितांना समारंभपूर्वक रोख रक्कम व मानपत्र देऊन सन्मानित केले जाते.
पुरस्कारांचे प्रकार:
१. मराठी भाषा आग्रही अधिवक्ता शांताराम दातार आणि रवींद्र सुर्वे पुरस्कार
२. जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार
३. दिनू रणदिवे मराठीस्नेही माध्यम पुरस्कार
४. समाजसेवक अशोक नाना चुरी आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार
पुरस्कारप्राप्त मान्यवर:
२०१९
१. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगाव
२. शिवाजी आंबुलगेकर, नांदेड
२०२०
१. प्रा. प्र ना. परांजपे, पुणे
२. प्रा. विद्याधर अमृते, मुंबई
२०२१
१. सुशान्त देवळेकर, मुंबई
२. सुषमा पाध्ये, पुणे
३. दीपाली जगताप, मुंबई
४. तानाजी देशमुख, सांगली
२०२२
१. विभा सुराणा, मुंबई
२. सुजाता पाटील, अलिबाग
३. नीरज पंडित, मुंबई
४. सनी गायकवाड, संभाजीनगर
२०२३
१. गिरीश सामंत, मुंबई
२. मंगल पवार, कोपरगाव
३. प्रसाद गोखले, मुंबई
४. राजन इंदुलकर, रत्नागिरी
आगामी उपक्रम
भारतीय भाषा परिषद
पार्श्वभूमी
तुषार पवार या आमच्या कार्यकर्त्याने भाऊसाहेब बांदोडकर पाठ्यवृत्त्ती प्रकल्पांतर्गत काश्मीर आणि मणिपूर वगळता देशभरातील इतर सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरांना आणि इतर काही निवडक महत्त्वाच्या शहरांना अभ्यास भेटी दिल्या आहेत. या संपूर्ण दौऱ्यातून भारतातील प्रमुख भाषांची व्यावहारिक पातळीवरील सद्यःस्थितीचा अंदाज मांडता येईल अशी माहिती गोळा झाली आहे. या माहितीच्या आधारे भारतीय भाषांची स्थितिगती सांगणारा अहवाल प्रसिद्ध करणे आणि त्याच वेळी देशभरातील सध्याच्या भाषिक स्थितीवर चर्चा घडवून आणणे, हा या परिषदेचा उद्देश राहील.
मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक सदस्य आणि अध्यक्ष डॉ. दीपक पवार हे CLEAR (Campaign for Language, Equality and Rights) – भारतीय भाषांच्या सबलीकरणासाठी – या संस्थेचेही संस्थापक सदस्य आहेत. ही संस्था भारतीय भाषांच्या विकासासाठी देशभरात संघटनात्मक स्वरूपात काही कार्यक्रम राबवत असते. इतरही संस्थांच्या मार्फत देशभरात विविध ठिकाणी अशा पद्धतीची चर्चासत्रे व परिषदांचे आयोजन होत असेल. मात्र क्षेत्रभेटींद्वारे प्रत्यक्ष संशोधनानंतर त्याआधारे होणारी ही भारतातील पहिलीच परिषद असेल. या निमित्ताने देशातील भाषाविकासाच्या प्रक्रियेची दिशा काही प्रमाणात स्पष्ट होण्यात आणि कदाचित आखण्यासही मदत होऊ शकेल. अशा प्रकारच्या परिषदेमुळे भारतीय भाषांचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि त्यासाठी तातडीने काम करण्याची आवश्यकता असल्याचा ठोस संदेश देशाच्या राजकीय आणि व्यवस्थापकीय व्यवस्थेपर्यंत पोहोचवता येईल, असे वाटते.
परिषदेचे स्वरूप आणि रचना
१. परिषद किमान तीन दिवसांची असावी.
२. परिषदेत उद्घाटन आणि समारोप ही सत्रे वगळता विविध विषयांवरील किमान नऊ सत्रांचा समावेश असावा. उद्घाटन आणि समारोप वगळता एका दिवसात किमान तीन सत्रांचे आयोजन करावे. यासाठी खाली नमूद केलेल्या विषयांच्या आधारे सत्रांची आखणी करता येईल.
- शैक्षणिक (शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण)
- माहिती तंत्रज्ञान (स्थानिकीकरण, ई-गव्हर्नन्स, युनिकोड)
- न्यायालयीन (जिल्हा आणि तालुका, उच्च न्यायालय, ग्राहक संरक्षण, प्रशासकीय न्यायालये/लवाद)
- भाषा आणि भांडवल (Language Economy)
- भाषाविकास आणि साहित्य, साहित्यिक वर्ग
- स्थलांतर आणि स्थानिकीकरण
- राजभाषा (विधिमंडळ, प्रशासन, निमशासकीय सेवा)
- त्रिभाषा सूत्र (धोरण, शिक्षणक्षेत्र, राज्यांतर्गत केंद्रीय आस्थापने, केंद्र शासनाची समिती)
- भाषानियोजन (केंद्र शासन, राज्य शासन, भारतीय भाषा संस्थान – CIIL)
- भाषिक राजकारण (राजकीय वर्ग, बिगर सरकारी संस्था – NGO)
- माध्यमे आणि भारतीय भाषा (वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ/एफ.एम, मनोरंजन वाहिन्या, समाजमाध्यमे, नाटक/सिनेमा)
- जागतिकीकरण आणि भारतीय भाषा (परिणाम, खाजगी क्षेत्र, बहुराष्ट्रीय कंपन्या)
- भारतीय भाषा आणि लिपी (स्वतंत्र आणि देवनागरी लिपीचा वाद आणि भारतीय भाषा, नव्या लिप्यांची निर्मिती आणि देवनागरी वाद, लिपी साधर्म्य, रोमन लिपी – भारतीय भाषांसाठी रोमन लिपी स्वीकारण्याचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सल्ला, महात्मा गांधींचा हिंदुस्थानीचा आग्रह)
- ईशान्य भारतातील भाषा
- संघराज्यपद्धती आणि भारतीय भाषा (यु.एस. मॉडेल, यु.एस.एस.आऱ. मॉडेल, जर्मन मॉडेल)
मराठी ऑलिंपियाड अर्थात मराठी प्रज्ञा संवर्धन चळवळ
मराठी प्रज्ञा संवर्धन चळवळ
पार्श्वभूमी
विज्ञान आणि गणिताच्या ऑलिंपियाडने जगभरात मूळ धरलेले आहे. भाषांच्या पातळीवर विविध स्पर्धा जगभरात आणि भारतात होत असल्या तरी त्यात बरेचदा साहित्यविषयक मूल्यमापनावरच भर दिसतो. भाषा, संस्कृती, भाषक समाज, भाषेचा इतिहास, एखाद्या भाषेपुढील समकालीन आव्हाने या पैलूंचा साकल्याने विचार करून तरुण पिढीला आपापल्या भाषांशी जोडणे आवश्यक आहे.
मराठी ऑलिंपियाड हे या दृष्टीने मराठी भाषेसाठी टाकलेले क्रांतिकारक पाऊल ठरेल.
परीक्षा तपशील
- ही परीक्षा पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या दोन स्तरांवर होईल.
२. मराठी प्रथम भाषा आणि मराठी द्वितीय व तृतीय भाषा यांच्यासाठी स्वतंत्र परीक्षा असेल.
३. या परीक्षांचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकातील संबधित इयत्तांच्या मराठीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.
तसेच पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त कोणकोणत्या विषयांचा त्यात समावेश असेल याची सूची पुढीलप्रमाणे :
अभ्यासक्रमातील विषय
१. मराठी भाषा
- मराठी भाषेचा उगम
- महानुभव, संत, पंत, तंत वाङ्मय – स्थूल परिचय
- शिवकालीन – पेशवेकालीन मराठी भाषा
- अव्वल इंग्रजी काळातील मराठी भाषा
- महाराष्ट्राच्या बोली भाषा
- मराठी वृत्तपत्रे उगम आणि विकास
- संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि मराठी भाषा
- महाराष्ट्र राज्याची स्थापना
- मराठी भाषेचे स्थान आणि भवितव्य
४. महाराष्ट्रातील शिक्षण
- प्राथमिक, माध्यमिक व उच्च
- शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान
२. महाराष्ट्राचा इतिहास
- मुघलांचा व विविध शाह्यांचा प्रभाव
- शिवकालीन महाराष्ट्र
- मराठ्यांचा साम्राज्यविस्तार
- पानिपतचे युद्ध – मराठेशाहीचा अस्त
- महाराष्ट्रातील समाजसुधारक
- जहाल-मवाळ क्रांतिकारक
- ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ
- संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा
- काँग्रेसची सत्ता – शिवसेनेचे आगमन
- महाराष्ट्रातील कामगार चळवळीचा उदयास्त
- जागतिकीकरण आणि महाराष्ट्र
३. कला-साहित्य-संस्कृती
- महाराष्ट्रातील शिल्पकला, नृत्य, चित्रकला, स्थापत्य, संगीत, नाट्यकला, जाहिरात, छायाचित्रण आणि चित्रपट
- लोककला
- कामगार रंगभूमी
- दलित रंगभूमी
- झाडीपट्टीची रंगभूमी
- प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन, नव साहित्य, साठोत्तरी, नव्वदोत्तरी, महानगरी, दलित, स्त्री, ग्रामीण, आदिवासी साहित्य
- लोकसाहित्य
- बाल-कुमार साहित्य
- मुस्लिम-मराठी साहित्य, ख्रिस्ती साहित्य
- खाद्यसंस्कृती, वेशभूषा, अलंकार इत्यादी
- धान्य, शेती, फळे इत्यादी
- महाराष्ट्राचा भूगोल
- महाराष्ट्राची मानचिन्हे (महाराष्ट्रातील वैज्ञानिक, उद्योगपती, गणितज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ… इत्यादी)
- महाराष्ट्राची पर्यटनस्थळे
५. बदलते तंत्रज्ञान, तंत्रसंस्कृती, समाजमाध्यमे आणि महाराष्ट्र
- इंटरनेट, वेबसाईट, ब्लॉग, फेसबूक, यूट्यूब, एक्स आणि इन्स्टाग्रामवरील मराठी
- तंत्रज्ञानाने वाकवलेली आणि वाढवलेली मराठी भाषा (इंटरनेटवरील अनुवादाची साधने)
- नव्या ज्ञानाची मराठी भाषा (ज्ञानकोश ते विश्वकोश व्हाया विकिपिडिया)
६. मराठी माणसाच्या आकांक्षा आणि समकालीन व उद्याचा महाराष्ट्र
- मराठी माणसाची स्वप्रतिमा
- जागतिकीकरणाने निर्माण केलेली आव्हाने
- नव्या मराठी माणसाचा शोध
७. मराठी भाषेचे लेखन, व्याकरण आणि संगणक
- प्रमाण लेखनाचे बदलते नियम
- संगणक आणि लेखनाचे नियम
- संधी, समास, वृत्त, अलंकार, वाक्याचे घटक, वाक्यपृथक्करण,
- विभक्ती, प्रयोग इत्यादी.
- मराठी स्पेलचेकर, मराठी थिसॉस, मराठी OCR
- इन्स्क्रीप्टचा कळफलक व युनिकोड
आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन करीत आहोत.
आपणही आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अभिप्राय पाठवून या चळवळीत सहभागी व्हावे तसेच मदतीचा हातभार लावावा.



